मामाच्या गावाला जाऊया

डॉ. गणेश चंदनशिवे,  chandan20@gmail.com

सुट्टी सगळ्यांनाच आवडते. पण गावाकडच्या सुट्टीची मौज काही आगळीच असते

एप्रिल महिन्यातील परीक्षेचा काळ संपला की मुलं उन्हाळय़ाच्या सुट्टीची देवासारखी वाट पाहात असतात. गावागावातील जत्रा, यात्रा चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केल्या जातात. मरीआई, जोखाई, म्हसोबा, वीर यांच्या छोटय़ा छोटय़ा चैतीच्या जत्रा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात कुलाचार म्हणून पार पाडल्या जातात. या जत्रांनिमित्ताने पै-पाहुण्यांना निमंत्रित केले जाते. कुठे पुरणपोळीचा नैवेद्य तर कुठे डाळ बाटीची मेजवानी दिली जाते. काही देवींना खाऱया जेवणाचा नैवेद्य तर काहींना गोड जेवणाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा महाराष्ट्रात अतीप्राचीन आहे. उन्हाळय़ाच्या सुट्टय़ामध्ये पै-पाहुणे आप्तेष्टांना निमंत्रित करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. यात मामाच्या गावाची ओढ हे सगळय़ा मुलांना लागलेली असते.

मामाचा गाव तसा नदीच्या किनारी. गावात दाट-गर्द वडाची झाडी. त्या झाडांवर सूरपारंब्याचा खेळ खेळण्यात काही वेगळीच मजा असते. हा खेळ श्रीकृष्णाच्या काळापासून चालत आलेला आहे. गोकुळात श्रीकृष्ण आपल्या सवंगडय़ांबरोबर सुरपारंब्याचा खेळ खेळायचे आता नावारूपाला आलेला क्रिकेटसुध्दा महाभारत काळात प्रचलित असावा.

अशाप्रकारे, खेडेगावातील खेळ हे शारीरिक कुस्तींबरोबर, मनोरंजन आणि आत्मानंदाला प्रोत्साहन देणारे ठरतात. उन्हाचा कडाका आहे हे लक्षात येऊनही नदीमधल्या डोहात पोहण्यासाठी परगावावरून आलेल्या पाहुणा आणि गावात नवीन झालेले मित्र जातात.

डोहामध्ये उंचावरून उडी टाकून जमिनीचा ठाव घेणे हे पोहण्यातील कसब. कबड्डी, कुस्ती, सूरपारंब्या, शिवाशिवी, लपवाछपवी, विटीदांडू हे सुटय़ांच्या काळांमधील मुलांचे आवडते खेळ, खेळाच्या निमित्ताने भटकंती करत असताना गावाच्या शिवापर्यंतची घनदाट झाडी, आंब्याची आमराई पायाखाली घालून ऐन पाडाला आलेल्या आंब्याच्या कैऱया तोडून कुणाला न दिसतील अशा ठिकाणी गोल खड्डा करून त्या खड्डय़ात गवतामध्ये कैऱया पुरल्या जातात. ही टाकलेली आढी आठ दिवसांच्या अंतराने पिकते पिकल्यानंतर रानमेवा म्हणूनच सवंगडी आढीच्या आंब्यावर ताव मारतात. ही मौजमजा खास करून उन्हाळय़ाच्या सुट्टीतच पाहवयास मिळते. या काळात घरातील गृहिणी गव्हाच्या चिकापासून बनविलेल्या सांडय़ा, तांदळाचे पापड, बाजरीच्या खारुडय़ा बनविण्यात मग्न असतात. खारुडय़ा बनवितात व विशेष करून महिलांची वेगवेगळी गाणी कानावर येतात.

अशाप्रकारे शेवया, कुरडया, पापड, बनवू आमरसाच्या दिवसांमध्ये उन्हाळय़ाच्या सुट्टीच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांना गावरान मेवा म्हणून मेजवानी देतात व उन्हाळय़ाच्या सुट्टीचा आनंद घेतात.