शुभ कृत्यांचा मंगल मुहूर्त – ‘गुढीपाडवा’

>>रामकृष्ण अघोर

शिराने गाळलेला जीर्ण पालापाचोळा आणि त्यामुळे उघडी पडलेली झाडे, जंगले, वने, शेते वसंताच्या आगमनाने नवीन पालवींची नाजूक शाल पांघरतात. अशोकाची, आंब्याची तोरणे वसंताचे आगमन झाल्याचे सुचवतात. केवळ कवीमनच काय, पण रुक्ष मनालासुद्धा आपल्या कुहू-कुहूने मंत्रमुग्ध करणारी कोकिळादेखील वसंताला साथ देते. आंब्यावरच्या पिवळ्या मोहरात लहान लहान कैऱ्या दिसू लागतात. मोगरा-जाई-जुईंचा सुगंध वाऱ्याच्या लहरीबरोबर खेळू लागतो. अशा प्रकारचे उत्साहाचे वारे वाहू लागले की समजावे, आता चैत्र महिना आला. चैत्र म्हणजे हिंदूच्या कालगणनेचा पहिला महिना आणि या कालगणनेप्रमाणे वर्षाचा सर्वप्रथम येणारा पहिला सण वर्षप्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा.

प्रभु रामचंद्र १४ वर्षे वनवास भोगून रावणाचा नाश करून अयोध्येत परतले. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. रामप्रभूंच्या आगमनाप्रीत्यर्थ गुढ्या-तोरणांनी सारी अयोध्या सजली. त्या शुभ दिवसाची आठवण म्हणून विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारून हा सण साजरा करतात. ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली तो दिवसदेखील चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच होता.

साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे. वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्य तृतीया) हा अर्धा, अश्विन शुद्ध दशमी (विजया दशमी) आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) हे पूर्ण असे साडेतीन मुहूर्त आहेत.

शालिवाहन राजाने मातीच्या पुतळ्यांमध्ये प्राण ओतून सैन्य तयार केले आणि त्या सैन्याच्या जोरावर आक्रमकांचा पराभव केला. म्हणजेच मातीच्या गोळ्याप्रमाणे निरुद्योगी मनाला चैतन्य देऊन, शक्ती ओतून कार्यास उद्युक्त करणे असा संदेश आहे. शालिवाहन राजाने सुरू केलेल्या शालिवाहन शकाचा पहिला दिवस वर्ष प्रतिपदा हाच होय.

प्राचीन काळात धर्मविधीवरून मकरसंक्रात हाच वर्षारंभ मानला जात होता. परंतु हा दिवस शिशिर ऋतूच्या आरंभी असल्याने नंतर वसंत ऋतू हाच योग्य मानून वर्षाचा आरंभाचा दिवस पुढे ढकलला. सुमारे ८०० वर्षापूर्वी काश्मीर प्रांतात चैत्र हाच वर्षाचा आरंभ दिवस मानला गेलेला होता. ख्यातनाम प्रवासी आल्बेरुनी ह्या सणाला ‘अगदू’ असे म्हणतो. कर्नाटकास ह्या दिवसास ‘युगादी’ असे म्हणतात.

ब्रह्मसंत, कल्पाब्द, रामसंवत, परशुराम, वामन, कृष्णावतार, महाभारत, बुद्ध, युधिष्ठर, मौर्य, विक्रम, शालिवाहन, हर्षाब्द, नेपाली, चालुक्य, सिंह, लक्ष्मणसेन इत्यादी वर्षगणनांची नावे प्रचलित आहेत. ज्योतिषशास्त्रात प्रगती सालमोन सौर आणि चांद्र वर्षाचे दिवस नक्की ठरविण्यात येऊन सूर्य आणि चंद्र यावरूनसुद्धा वर्षगणना करण्याची सुरुवात झाली. विक्रमादित्य राजाच्या कारकीर्दीत सालमोन विक्रम संवत असे नाव पडले. नारद संहितेमध्ये ब्रह्म, दैव, मनुष्य, पित्र्य, सौर, चांद्र अशा प्रकारच्या ९ कालगणनांचा उल्लेख आहे. मलबार प्रांतात घरोघरी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ह्या दिवशी घरात दागदागिने, रत्ने, मौल्यवान वस्तू, फळफळावळ, अनेक शोभिवंत वस्तू देवघरात देव्हाऱ्यासमोर ठेवून पहाटे घरच्या कर्त्या पुरुषांकडून पूजा केला जाते. मलबार समुद्र किनाऱ्यावर राहणारे लोक चैत्र शुद्ध प्रतिपदा ही मत्स्य जयंती म्हणून साजरी करतात. त्या दिवशी मासे मारत नाहीत.

गुढीपाडव्यासंबंधी अनेक लोककथा आणि दंतकथा प्रचलित आहेत. प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता. त्याची प्रजा सुखी आणि समाधानी होती. पुढे वसू राजाने अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येमुळे देवांचा राजा इंद्र प्रसन्न झाला. त्याने वसू राजास वैजयंती माला व विमान आणि एक वेळूची काठी देऊन आपल्या राजधानीत जाऊन परत राज्य करण्याचा उपदेश केला. वसू राजाने आनंदाने वेळूच्या काठीस भरजरी वस्त्र, गंध, फुले व फुलांच्या माळांनी शृंगारून नगरात प्रवेश केला. याच दिवशी नारदमुनीस झालेले ६० पुत्र हे ६० संवत्सर असून त्यापैकी प्रत्येकाचा आरंभ याच दिवशी साजरा करतात.

गुढीपाडव्याला घरात जरी गोड पक्वान्ने केली असली तरी प्रथम कडुलिंबाची पाने खाऊन मगच दिनक्रमाला आरंभ करावयाचा अशी धार्मिक परंपरा आहे. त्या दिवशी पहाटे उठून स्नान केल्यावर सर्वप्रथम कडुलिंबाचा नैवेद्य दाखवतात. कडुलिंबाच्या पानाचे भक्षण करणे हे शारीरिक बंधन असे आपले आरोग्य शास्त्र सांगते. कारण कडुलिंबाचे पान हे अत्यंत गुणकारी आहे. त्या पानात रोगप्रतिकार शक्ती आहे. कडुलिंबाला अमृत वृक्ष असेही म्हणतात. ह्याच्या सेवनाने आयुष्यवर्धन होते.

गुढीपाडव्याच्या शुभदिनी प्रत्येक व्यक्तीने मागील वर्षी आपल्या हातून घडलेल्या बऱ्या वाईट कामाचे सिंहावलोकन करावे आणि नव्या वर्षात सत्कर्म करण्याचा संकल्प करावा. आपले आचरण पवित्र, मंगल, सात्त्विक, प्रेमळ करण्याचा निश्चय करून या शुभदिवसापासून त्याप्रमाणे वागण्यास सुरुवात करावी. आपले शेजारी, पाजारी, मित्र-मैत्रिणी नातेवाईक यांची भेट घेऊन त्यांना नवे वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि आनंदाचे जावो अशी सदिच्छा व्यक्त करावी. या सणाच्या निमित्ताने परस्परांबद्दल आपुलकी, एकोपा घडवून आणण्यासाठी एक शपथ मनोमन घेऊन जर गुढीपाडवा नवीन वर्षाचा सण आपण साजरा केला, नवीन वर्षात घेतलेल्या अनेक संकल्पापैकी काही एक तरी चांगल्या संकल्पना अगदी मनापासून पूर्ण केल्या तर आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला गुढीपाडवा आणि इतर सण आणि परंपरांमधील प्रेमाचा ओलावा अखंडपणे वाढत जाईल आणि आपल्या सणांचा मुख्य हेतू खऱ्या अर्थाने साध्य होईल.

गुढीपाडवा हा पूर्ण मुहूर्ताचा दिवस असल्याने त्या दिवशी अनेक उपक्रमांना आणि शुभकार्याला सुरुवात करत असतात. इतकेच नव्हे तर त्या दिवशी मुद्दाम खरेदीदेखील केली जात असते. हा दिवस ‘सोनियाचा दिन’ म्हणून ह्या शुभमुहूर्तावर सोन्याची खरेदी करतात. सोन्या-चांदीलादेखील पूर्वेतिहास आहे. अगदी रामायण आणि महाभारत काळापासून सोन्याचे महत्त्व आहे. इसवीसन पूर्व ३५०० मध्ये मेसोपोटेमियातील (हल्लीचा इराक) लोक सोन्याचे कप वापरत असल्याचे दिसून येते. इजिप्शियनांना सोन्याची पाने तयार करण्याची कला अवगत होती. हजार पाने बसवू शकत होते. दोन हजार वर्षांपूर्वी दंतवैद्य दातदुखीवर इलाज करण्यासाठी सोन्याचा वापर करीत असत.

आता काळ बदलत चाललेला आहे. सोने खरेदीबरोबर एके काळी चैनीच्या वाटणाऱ्या वस्तू आता गरजेच्या झालेल्या आहेत. आता लोकांची टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, घरगुती दळली जाणारी चक्की, मिक्सर खरेदी करण्याकडे कल आहे. तसेच नवीन कपडेदेखील खरेदी केले जातात. सणांच्या माध्यमातून उत्सव साजरे करून राष्ट्रीय एकात्मता साधली जाते.