घराचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला?

प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असावे हे जाणून घेण्यापेक्षा या प्रवेशद्वारावर काय लावले म्हणजे ते शुभ फल देईल ते जाणून घेणे जास्त गरजेचे आहे. वास्तुशास्रानुसार गेटवर काही शुभ वस्तू, शुभ चिन्हे लावली तर घरात सुखसमृद्धी नांदते असे म्हटलेले आहे.

वास्तुशास्रानुसार घराचे प्रवेशद्वार अतिशय महत्त्वपूर्ण असते. येथूनच सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असतात. त्यामुळे येथेच योग्य ती खबरदारी घेतलेली असेल तर नकारात्मक ऊर्जा घरात शिरू शकणार नाही. घराचे प्रवेशद्वार म्हणजे मेन एन्टरन्स उत्तर दिशेकडे असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा सतत येत राहाते असे वास्तुशास्रात नमुद करण्यात आले आहे. या शास्रानुसार दक्षिण दिशा ही नरकाची दिशा मानली गेलेली आहे. त्यामुळे या दिशेला घराचे प्रवेशद्वार असेल तर घरातील कर्त्या पुरुषासाठी नरकाचे द्वार खुले होते असा समज आहे.

हेही लक्षात ठेवा

प्रवेशद्वार उघडताना किंवा बंद करताना त्याचा आवाज होता कामा नये. कारण आवाज येत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा झटकन शिरते. आवाज करणारे प्रवेशद्वार असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यायला पाहिजेत. दुसरे म्हणजे प्रवेशद्वारावर नेहमी चांगला प्रकाश पडत राहिला पाहिजे. म्हणजे दरवाजा लोकांना चांगला दिसला पाहिजे. यासाठीच प्रवेशद्वारावर लख्ख प्रकाश देणारा दिवा लावणे शुभ असते. घराच्या मुख्य दरवाजावर घरातल्या प्रमुखाचे नाव असलेली पट्टी छान अक्षरात लावायलाच हवी. कारण त्यामुळेही घरात सकारात्मकता नांदते. हे नाव साध्या आणि सरळ अक्षरांत असावे. ते सहज वाचता आले पाहिजे.

‘भविष्या’साठी केवळ राशीवर अवलंबून राहाल तर फसाल!

दारावर काय लावायचे?

काचेची भांडी : घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाण्याने भरलेले मोठे भांडे ठेवायचे. त्यात सुवासिक ताजे फूल ठेवायचे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

तोरण : घरातल्या कर्त्या पुरुषाने आपल्या हाताने पिंपळाच्या, अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानांचे तोरण बनवून प्रवेशद्वारावर टांगले पाहिजे.

लक्ष्मी माता : बऱ्याचजणांच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मी माता किंवा कुबेराचे छायाचित्र लावलेले असते. वास्तुशास्रानुसार तसे करणे खूपच चांगले असते. कारण त्यामुळे घरात धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही.

लक्ष्मीची पावले : लक्ष्मी मातेच्या चित्रांप्रमाणेच प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलेही लावता येतील. ही पावले रांगोळीने किंवा सिंदूराने बनवली तर आणखी उत्तम. यामुळे घरात समृद्धी कायम नांदते म्हणतात.

शुभ लाभ : लक्ष्मीच्या पावलांबरोबरच सिंदुराने प्रवेशद्वारावर दोन्हीकडे (आतून बाहेरून) ‘शुभ लाभ’ असे लिहायचे. यामुळे घर वाईट नजरांपासून वाचवता येते.

स्वस्तिक : प्रवेशद्वारावर स्वस्तिकचे चिन्ह लावले असेल तर घरात सौभाग्य नांदते. हे स्वस्तिक चिन्हही सिंदुराने बनवले तर जास्त चांगले.

आयुष्यात एकदा तरी शनिची साडेसाती यावी!

आपली प्रतिक्रिया द्या