1 ऑक्टोबरपासून कर्जे स्वस्त होणार!स्टेट बँकेने केली व्याजदरात कपात

ऐन दिवाळीच्या तोंडावर देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेचे (एसबीआय) कर्ज स्वस्त होणार आहे. कारण येत्या 1 ऑक्टोबरपासून एसबीआयने आपल्या व्याजदरात कपात करीत फ्लोटिंग दर असलेल्या एमएसएमई, हाऊसिंग आणि रिटेल कर्जाला रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट लावण्याचे ठरविले आहे.

यापूर्वी रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांना 4 सप्टेंबर रोजी नोटीस पाठवून कर्जांना रेपो दरांनुसार व्याज लावण्याचे निर्देश दिले होते. बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱया कर्जावर बँकांना द्यावे लागणारे व्याज म्हणजे रेपो रेट. त्यानुसारच बँका आपल्या ग्राहकांकडून व्याज वसूल करतात. रिझर्व्ह बँकेनेच रेपो रेटमध्ये कपात केल्यामुळे आता बँकांनाही आपल्या व्याजात कपात करणे क्रमप्राप्तच आहे. स्टेट बँकेने या वर्षी 1 जुलै रोजीच ग्राहकांना देणाऱया आपल्या कर्जांवरील व्याजदर रेपो रेटशी संलग्न केला होता.

व्याजदर बदलावे लागणार
स्टेट बँकेसहित सर्वच बँकांची कर्जे सध्या ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस् बेस्ड लेंडिंग रेट’वर (एमसीएलआर) आधारित आहेत. पण रिझर्व्ह बँकेला ते मान्य नाही. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आता दर 3 किंवा 6 महिन्यांत एकदा बँकांना आपले व्याजदर बदलावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या