अमित शहा ‘कोरोनामुक्त’? भाजपमध्ये संभ्रम

1324
amit-shah

कोरोनाची लागण झाल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातच भाजप नेते मनोज तिवारी यांनी गृहमंत्र्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती ट्विट करत दिली आणि तासाभरातच त्यांनी ते ट्विट डिलीट केले. त्यामुळे शहा खरंच ‘कोरोनामुक्त’ झाले का? असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने शहा यांची नव्याने कोणतीही चाचणी झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी 2 ऑगस्टला स्वतः ट्विट करत आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. तेव्हापासून त्यांच्यावर गुडगावच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहा हे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावेत यासाठी देशभरातील भाजप कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत. त्यातच रविवारी सकाळी दिल्लीतील भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी गृहमंत्र्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची आनंदाची बातमी ट्विट करत दिली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीदेखील तिवारी यांचे ट्विट रिट्विट करत समाधान व्यक्त केलं, पण काही वेळातच या दोघांनीही ट्विट डिलीट केल्याने शहा यांच्या प्रकृतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शहा यांचं ट्विट किंवा मेडिकल बुलेटिन ग्राह्य समजा

दरम्यान, गृह मंत्रालयाने अमित शहा यांची नव्याने कोणतीही कोरोना चाचणी करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच गृहमंत्र्यांच्या तब्येतीबाबत अमित शहा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिलेली माहिती किंवा ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांच्या मेडिकल बुलेटिनमधील माहितीच ग्राह्य समजण्यात यावी, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

आणखी दोन केंद्रीय मंत्र्यांना कोरोना

गृहमंत्री शहा यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्रिमंडळातील आणखी दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अवजड उद्योग आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघकाल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर कैलास चौधरी यांच्यावर राजस्थान येथील जोधपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या