नमस्कार, मी गृहमंत्री बोलतोय… तुमच्या तक्रारीचे निवारण झाले का? गृहमंत्र्यांकडून अर्जदाराशी फोनवर संवाद

792

‘दिलीपराव, नमस्कार… मी अनिल देशमुख बोलतोय… गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य… पुणे पोलीस आयुक्तालयात आलो होतो. तुमची तक्रार पाहिली. तुम्हाला पोलिसांकडून व्यवस्थित ट्रिटमेंट मिळाली का?’ अशी फोन करून विचारणा करीत गृहमंत्र्यांनी अर्जदाराला आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

गृहमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच अनिल देशमुख सोमवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध उपक्रमांची माहिती घेऊन ‘सेवा’ उपक्रमासह ‘भरोसा’, ‘दामिनी’ उपक्रमांचे कौतुक केले. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण झाले की नाही? या संदर्भात ‘सेवा’ उपक्रमाद्वारे अर्जदारांना फोन करून पडताळणी केली जाते. त्याचा अनुभव घेण्यासाठी गृहमंत्री देशमुख यांनी दिलीप पवार आणि नीलेश शिंदे या दोन अर्जदारांना ‘सेवा’ उपक्रमाअंतर्गत पोलीस आयुक्तालयातून मोबाईलवर फोन केला. ‘दिलीपराव, पोलीस आयुक्तालयातून गृहमंत्री अनिल देशमुख बोलत आहे. पोलीस व्हेरिफिकेशसंदर्भात तक्रारीचे निवारण झाले का? पोलिसांकडून तुम्हाला व्यवस्थित ट्रिटमेंट मिळाली का?’ अशी विचारणा केली. त्यानंतर दिलीप पवार यांनी पोलिसांकडून उत्तम सहकार्य मिळाल्याची माहिती गृहमंत्र्यांना दिली. पोलिसांकडून समाधान झाल्याचे ऐकताच गृहमंत्री देशमुख यांनी दिलीप पवार आणि नीलेश शिंदे यांना हसून दाद देत तेच तपासण्यासाठी फोन केल्याचे सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, विशेष शाखेचे मिलिंद गायकवाड यांच्यासह कर्मचारी पूजा भगत, स्वाती राऊत, राजश्री भापकर, स्वाती पोमण, सारिका कांबळे, तनुजा सावंत, सुप्रिया मानकर, अतुल आदक, ‘सेवा’ आणि ‘भरोसा’, ‘दामिनी’ पथकांतील कर्मचाऱ्यांचे देशमुख यांनी कौतुक केले.

देशमुख यांच्याकडून 1 लाख 99 हजार 930वा कॉल
‘सेवा’ उपक्रमाअंतर्गत अर्जदारांना फोन करून प्रतिसाद देण्यात येतो. त्यामध्ये अर्जदाराने केलेली तक्रार, पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याकडून दिला जाणारा प्रतिसाद, तक्रारीचे निवारण झाले की नाही, या संदर्भात विचारपूस केली जाते. आतापर्यंत पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्याकडून एक लाख 99 हजार 929 कॉल केले आहेत. काल गृहमंत्री देशमुख यांनी एक लाख 99 हजार 930 वा कॉल करून अर्जदाराला आश्चर्याचा धक्का दिला.

थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोन केल्याच्या विश्वास बसत नसल्यामुळे दिलीप पवार यांनी पोलीस आयुक्तालयात पुन्हा फोन लावला. ‘माझ्याशी खरंच गृहमंत्री देशमुखसाहेब बोलत होते का?’ अशी विचारणा त्यांनी कर्मचाऱ्यांना केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना होय, तुमच्याशी गृहमंत्री बोलत असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या