दापोलीत होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू, कारण अस्पष्ट

482

दापोली तालुक्यात होम क्वॉरंटाईन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बुरोंडी तेलेश्वर नगर येथील 55 वर्षीय व्यक्ती दि 20 मार्च रोजी घाटकोपर मुंबई येथून बुरोंडी येथे आली होती. म्हणून उबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना 24 मार्च रोजी होम क्वारंटाईन केले होते.

गुरूवारी रात्री अचानक त्या व्यक्तीस चक्कर येऊन तोंडातून फेस येऊ लागल्याने त्यांना ग्रामस्थांनी दापोली येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे हाताचे ठोके कमी लागत असल्याने तात्काळ उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे रवाना केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या मृत व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी घेतलेला आहे.

या व्यक्तीच्या मृत्युचे नक्की कारण स्पष्ट होणे बाकी असल्याने कोणीही अफवा पसरवू नयेत, असे आवाहन दापोली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले आहे. त्या व्यक्तीसोबत रूग्णालयात आलेल्या दहा जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या