होमगार्डना गणपती बाप्पा पावला: वर्षाला किमान १८० दिवस सेवा कालावधी मिळणार

961

गेली अनेक वर्षे केवळ सण उत्सव व निवडणूक कालावधीत सेवा बजावणारा होमगार्ड आता कायमस्वरूपी पोलीसांसोबत सेवा बजावणार आहे. प्रत्येक होमगार्डला पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात किमान १८० दिवस सेवा कालावधी मिळणार आहे.

दरम्यान, होमगार्डच्या मानधनातंही शासनाने वाढ केली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रामाणिक सेवा बजवणाऱ्या होमगार्डला गणपती बाप्पा पावला आहे.

राज्य शासनाच्या नव्या आदेशात होमगार्डला अच्छे दिन आले आहेत. पूर्वी वर्षभरात जेमतेम ५० दिवस सेवा बजावणारा होमगार्ड आता कायमस्वरूपती दर दोन महिन्यांनी ड्युटी बदलून सेवा देणार आहे. २२ ऑगस्ट पासून नव्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

जिल्ह्यात १३ पोलीस ठाण्यात नियुक्ती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७८ पुरुष व ७१ महिला असे एकूण ३४९ होमगार्ड कार्यरत आहेत. त्यापैकी १०० होमगार्डची तुकडी जिल्ह्यातील १४ पोलीस ठाण्यात १०, ७ व ५ या स्वरूपात दर दोन महिने सेवा बजावणार आहे. त्या बरोबर सण-उत्सवात व निवडणूक कालावधीत अधिकचा बंदोबस्तसाठी आवश्यकतेनुसार अधिक होमगार्ड सेवेत घेतले जाणार आहेत.

मानधनात वाढ

पूर्वी अल्प स्वरूपात असलेले होमगार्डचे मानधन आता ६७० रुपये प्रति दिवस (कर्तव्यभत्ता ५७० व १०० रुपये आहार भत्ता) असे करण्यात आले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. तर नव्याने भरती प्रक्रियाही राबवली जाणार असून नव्याने रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

पोलिसांना मिळणार नवे बळ

प्रत्येक पोलीस ठाण्यात अपुरा कर्मचारी वर्ग हा प्रश्न कायम आहे. त्यात आता पोलिसांच्या मदतीला होमगार्ड असल्यामुळे पोलिसांचा ताण काहीसा हलका होणार आहे. पोलीस ठाण्यात मदत तसेच अन्य बंदोबस्त व वाहतूक नियंत्रणात ठेवत वाहतूककोंडी टाळण्यासाठी होमगार्डची नियुक्ती केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या