
थंडीत बेघरांवर कारवाई न करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय असतानादेखील गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईतील चर्नी रोड येथील स. का. पाटील उद्यान पदपथ, ऑपेरा हाऊस, आझाद मैदान, लोकमान्य टिळक मार्ग, व्ही. पी. रोड, डी. बी. मार्ग, दवा बाजार या परिसरात बेघरांवर पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येत आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार करत पोलीस उपआयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची चौकशी करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबईत स्वतःचे घर नसलेले 50 हजारांहून अधिक बेघर नागरिक रस्ते, पदपथ, रेल्वे स्थानक, उड्डाणपूल, मोकळय़ा जागा अशा विविध ठिकाणी वास्तव्य करतात. यात काही कुटुंबे आहेत. काही एकल नागरिक तसेच वयोवृद्ध स्त्र्ााr-पुरुष, तरुण मुले आणि मुली अशा विविध प्रकारचे लोक वर्षानुवर्षे मुंबईत बेघर म्हणून राहत आहेत. मुंबई पोलिसांतर्फे गेल्या पाच दिवसांपासून दक्षिण मुंबईतील बेघर नागरिकांवर अमानुष पद्धतीने कारवाई केली जात आहे. संध्याकाळी आणि रात्रीच्या अंधारात अचानक पोलिसांचा ताफा येतो. झोपलेल्या बेघरांना हाकलले जाते. विरोध करणाऱ्यांना काठय़ांनी बडवले जाते. काही ठिकाणी प्लॅस्टिक, पुठ्ठय़ांचे छप्पर बांधण्यात आले होते, ते या कारवाईतून तोडूमोडून टाकण्यात आले आहेत. बेघरांचे कपडे, अन्नधान्य, मुलांची शाळांची दप्तरे जप्त करण्यात आली. कहर म्हणजे स. का. पाटील उद्यानाजवळ झालेल्या कारवाईत टॅकरने पदपथावर पाणी ओतण्यात आले. विशेष म्हणजे राज्य सरकारने थंडीमध्ये बेघर नागरिकांवर कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. 24 डिसेंबर 2021 रोजी याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानंतरही कारवाई होत असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
कारवाईच्या चौकशीची मागणी
बेघर नागरिकांवरील कारवाई थांबवण्यासाठी 1 सप्टेंबर 2022 रोजी आपण पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानंतरही ही कारवाई का करण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी गलगली यांनी पत्रात केली आहे. मुंबई महापालिका हद्दीत 125 शेल्टर होम युद्धस्तरावर बनविणे, पुरेशी निवारा पेंद्र उभारली जाईपर्यंत बेघरांवरील कारवाई थांबवावी तसेच पंतप्रधान आवास योजनेत बेघर नागरिकांना घरे द्यावीत, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.