आरोग्य अधिकारी भरतीला स्थगिती द्या! होमियोपॅथी डॉक्टर्स न्यायालयात जाणार

38

सामना प्रतिनिधी, मुंबई

सरकारी आरोग्य सेवेमधील भरती प्रक्रियेत सतत डावलले जात असल्याने राज्यातील सत्तर हजार होमियोपॅथी डॉक्टर्स न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात होमियोपॅथी डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी आज आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली होती. राज्य सरकार होमियोपॅथी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे; परंतु सीएचओ पदाच्या भरतीत त्यांचा समावेश करण्यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करावी लागेल, असे आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी दिले. मात्र तोपर्यंत सीएचओ भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशी होमियोपॅथी डॉक्टरांच्या ‘हिम्पॅम’ संघटनेची मागणी आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सीएचओ पदासाठी आयुर्वेद, युनानी आणि अगदी नार्ंसगच्या पदवीधरांना पात्र ठरवले गेले आहे. परंतु होमियोपॅथी डॉक्टरांना मात्र पात्रता असूनही या भरती प्रक्रियेत त्यांचा समावेश केला गेलेला नाही. सरकारने सांगितल्याप्रमाणे अनेक होमियोपॅथी डॉक्टरांनी ऍलोपथीचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यानंतरही त्यांना भरतीमध्ये डावलले जात आहे. खेडय़ापाडय़ात, दुर्गम भागात होमियोपॅथी डॉक्टर्स आरोग्य सेवा देत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टर्स जाण्यास तयार होत नाहीत तिथे होमियोपॅथी डॉक्टर्स काम करण्यास तयार आहेत. तरीसुद्धा त्यांना नेमले जात नाही अशी व्यथा होमियोपॅथी डॉक्टरांनी मांडली. सीएचओच्या 5935 पदांच्या भरतीसाठी येत्या 21 जुलै रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तत्पूर्वी होमियोपॅथी डॉक्टरांबाबत निर्णय झाला तरच त्यांना न्याय मिळेल, असे ‘हिम्पॅम’चे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या