रॉयल एनफिल्ड टक्कर द्यायला होंडाची बाईक !

सामना ऑनलाईन । मुंबई

दमदार, दणकट आणि स्टायलिश बाईक अशी रॉयल एनफिल्डची ओळख आहे. मात्र रॉयल एनफिल्डला लवकरच नवा प्रतिस्पर्धी मिळणार आहे. बाईक्ससाठी प्रसिद्ध होंडा कंपनी पावरफूल बाईक्स बनवण्याच्या तयारीत असून एक प्रयोग म्हणून याकडे पाहत आहे. होंडा सीबीआरच्या पुढे जात कंपनी मोठ्या दिसणाऱ्या आणि पावरफूल अशा बाईक्स निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती होंडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

होंन्डा कंपनीने या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी एक टीम तयार केली आहे. या टीममध्ये थायलंड, जपान येथील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. होंडा कंपनीच्या ३०० आणि ५०० सीसीच्या बाईक्सही सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्यांना आता अशी बाईक बनवायची आहे जी रॉयल एनफिल्डला टक्कर देऊ शकेल. रॉयल एनफिल्डला टक्कर देणे होंडासाठी आव्हानच असेल. त्यामुळे होंडा हे आव्हान पेलण्यात यशस्वी होणार की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र होंडीची ही नवी बाईक कशी असेल याची उत्सुकता बाईक प्रेमींसह सर्वांनाच लागली आहे.