कवठे येमाईच्या 2 तरुणांचा प्रामाणिकपणा; कुरियर कंपनीचे सापडलेले दिड लाखांचे टॅब केले परत

आजच्या धकाधकीच्या जगात प्रामाणिकपणा व खरे बोलणारे कमी झाले आहेत. अशा परिस्थितीतही प्रामाणिकपणाची सर्वासमोर आदर्श ठेवणारी उदाहरणे दिसून येतात. त्याचाच प्रत्यय नुकताच पुण्याच्या रिले एक्स्प्रेस कंपनीच्या कुरियर कर्मचाऱ्यांना आला. हरवलेल्या दिड लाखांच्या 10 टॅबचा बॉक्स त्यांना परत मिळाला आहे. कवठे येमाईच्या दोन तरुणांकडून प्रामाणिकपणाचा प्रत्यय अनुभवायला मिळाला आहे.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाईचे सचिन लहू वागदरे,प्रशांत विलास वरे 8 ऑगस्टला कामानिमित्ताने दुचाकीवरून पुण्यास जात असताना पुण्याच्या संगमवाडीजवळ समोर चाललेल्या कुरियर गाडीतून बॉक्स पडताना दिसला. दुचाकी थांबवून तो बॉक्स घेत त्या पुढे गेलेल्या गाडीचा पाठलाग केला पण गाडी जोरात निघून गेली. या दोन तरुणांनी तो बॉक्स घरी आणला व त्यावर असलेल्या दूरध्वनीवर गुजरातच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून खात्री केली. बॉक्स सहीसलामत असून घेऊन जाण्यासंदर्भात विनंती केली.

संबंधित कुरियर कंपनीचे कर्मचारी गणेश पवार,अशोक कदम दुचाकीवरून पुण्यापासून 70 किमी दूर असलेल्या कवठे येमाई येथे बुधवारी भर पावसात दाखल झाले. येथील ग्रामपंचायत कार्यालयात वागदरे,वरे या दोन प्रामाणिक तरुणाच्या उपस्थितीत 10 टॅब त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास सांडभोर, पांडुरंग भोर, सचिन बो-हाडे, विलासराव रोहिले, अरुण वागदरे, रोहिदास हिलाळ, गणेश रत्नपारखी, बबलू गावडे, गोरख वागदरे, गोविंद वागदरे, वसंत सावंत, गणेश दळवी व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

कवठे गावच्या सरपंच मंगलताई रामदास सांडभोर,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ अनेक ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी व ग्रामस्थांनी वरे व वागदरे या दोन तरुणांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.तर हरवलेले 10 टॅब परत मिळाल्याने भारावून गेलेल्या कुरियरच्या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करीत त्या तरुणांना बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. तो ही त्या दोन तरुणांनी नम्रपणे नाकारला. कवठे येमाईच्या वागदरे व वरे या दोन तरुणांनी दाखवलेला प्रामाणिकपणाचा प्रत्यय इतरांसाठी नक्कीच आदर्शवत व प्रेरणादायी असाच आहे.