लहान मुलांना मध देताय? मग आधी हे वाचा

3125

लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी सकस आहाराची नितांत आवश्यकता असते. अनेक पालक आपल्या मुलांना जीवनसत्त्व असलेले पदार्थ खाऊ घालतात. त्यात असेही अनेक पदार्थ आहेत, ज्यांच्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. या पदार्थांमध्ये मध हा असा पदार्थ आहे, जो सकस आहारामध्ये येतो. मात्र, त्याचे दुष्परिणामही तितकेच असतात.

काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, खूप लहान मुलांना मध खायला घालणं योग्य नसतं. खरंतर मधात असलेली जीवनसत्वे शरीरासाठी योग्य असतात. पण, बहुतांश वेळा मध कच्चा (raw) परिस्थितीत आणि त्यावर कुठलीही पाकक्रिया न करता खाल्ला जातो. मधात क्लोस्टिडयम बोटुलिनम नावाचे जीवाणू असतात. या जीवाणूंमुळे लहान मुलांना अन्नातून विषबाधा होऊ शकते.

वास्तविक मधाच्या माध्यमातून हे जिवाणू मोठ्या माणसांच्या शरीरातही जात असतात. पण, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांच्या पचनक्रियेवर या जीवाणूंचा परिणाम लगेच होतो. त्यामुळे लहान मुलांना मध खाऊ घातल्यानंतर तब्बल 8 ते 36 तासांपर्यंत त्याचा परिणाम दिसू शकतो. तसंच खूप गोड खाल्ल्याने दुधाच्या दातांवरही त्याचा परिणाम होतो. म्हणून शक्यतो 12 महिने वयाच्या आतील मुलांना मध खायला खालू नये, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. लहान मुलांच्या आहारासंबंधी काहीही शंका असल्यास पालकांनी आधी बालरोग तज्ज्ञाला विचारूनच आहार निश्चित करावा, असंही वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या