फेसबुक मित्रांना घरी बोलवायची आणि अश्लील फोटो काढायची, ब्लॅकमेलर बंटी-बबली अटकेत

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील हनी ट्रप गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बोगस पोलीस बनून ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. एक तरुण आणि एका तरुणीला अटक करण्यात आली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या गँगच्या कामाच्या तंत्राबाबत पोलिसांनी माहिती दिली. योजनाबद्ध पद्धतीने श्रीमतांना जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करत पैसे उकळण्यात येत होते, असे पोलिसांनी सांगितले.

या गँगमधील तरुणी फेसबुक किंवा इतर सोशल मिडीयाद्वारे श्रीमंत व्यक्तींना शोधून त्यांच्याशी मैत्री करायच्या. मैत्री वाढल्यावर त्या श्रीमंताना आपल्या फ्लॅटवर बोलवायच्या. त्यानंतर त्यांचे अश्लील आणि आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्र काढण्यात येत होते. त्यानंतर त्या व्यक्तींना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यात येत असत. या छायाचित्रांद्वारे संबंधितांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. तसेच या गँगमधील काहीजण बोगस पोलीस बनून संबिधितांवर धाड टाकत आणि पैसे देण्यासाठी दबाव टाकत. बदनामी टाळण्यासाठी अनेकजण पैसे देत असत. त्यामुळे या गँगचे फावले होते. बदनामीच्या भीतीने कोणीही याबाबत तक्रार केली नाही. अनेकजण या गँगच्या जाळ्यात अडकल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिल्लीतील एका व्यक्तीने याबाबतची तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यावर या गँगचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी जावेद आणि मधुमिता उर्फ जोया या दोघांना अटक करण्यात आली असून या गँगचे इतर 7 जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या