माझा best पार्टनर; गिरीजा ओक- सुहृद गोडबोले

गिरीजा सुहृद गोडबोले. मधुचंद्र म्हणजे असंख्य आठवणींचा गोफ.
मधुचंद्र म्हणजे – लग्नाच्या धाकपळीनंतर मिळालेला ब्रेक म्हणजेच माझ्यासाठी मधुचंद्र.
फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – खरंतर जरा गम्मत झाली. आम्ही इंडोनेशियातील बालीला जाणार हे आधीच ठरलं होतं. सुहृदचा पासपोर्ट रिन्यू करायचा होता. आज करू उद्या करू म्हणता म्हणता लग्नाला आठवडा उरलेला असताना त्याने पासपोर्ट रिन्यूअल साठी कागदपत्रे दिली. आता कदाचित प्लॅन फिस्कटणार असं काटत असतानाच पासपोर्ट मिळाला आणि आम्ही ठरलेल्या दिवशी गेलो.
आवडलेलं ठिकाण? – आम्हाला दोघांनाही समुद्रकिनारे फार आवडतात. त्यामुळे आम्ही सतत त्या समुद्रकिनाऱयांवरच असायचो. तिथे आम्ही ‘प्लातारान रिसॉर्ट’मध्ये राहत होतो. तिथे आम्ही विल्लाज्मध्ये राहत होतो. त्या प्रत्येक विल्लामध्ये एक लहान स्विमिंगपूल होता. तिथलं पारंपरिक बालीनिस बांधकाम फार सुंदर होतं..
ठिकाणाचे वर्णन – बाली हे वैविधतेने नटलेले आहे. तिथले समुद्रकिनारे, हस्तकला, केनच्या वस्तू प्रसिद्ध आहेत. तिथले नाईट लाईफ खूप छान आहे.
तिथे केलेली शॉपिंग – मी माझ्या जवळच्या मैत्रीणींसाठी केनच्या छोटय़ा बॅगा घेतल्या होत्या. त्या अजूनही वापरतात.
काही खास क्षण – आम्ही एका बीचवर वॉटरस्पोर्ट्साठी गेलो होतो. तिथे आम्ही जेट-स्की (वॉटर स्कूटर) चालवायला घेतली. मला दुचाकी अजिबात चालवता येत नाही आणि सुहृदला दुचाकी चांगली चालवता येते त्यामुळे तो चालवणार होता. मारे लाईफ जॅकेट घालून आम्ही जेट स्की वर बसलो. आता तुफान वेगात फिरायचं तर सुहृद 10 च्या स्पीडने जेट स्की चालवू लागला.आमचे फोटो काढणारा माणूस आमच्यावर हसू लागला. प्रत्येक वेळेस लाट आली की सुहृद अजूनच घाबरून थांबूनच जायचा. एका क्षणी वाटले त्याच्या हातून घेऊन मी चालवावी. आजही ते आठकून खूप हसायला येतं
मधुचंद्र हवाच की… – मला काही हवाच असे वाटत नाही. पण ज्यांचे जुळवून लग्न झाले त्यांच्यासाठी मधुचंद्र हवाच. एकमेकांना ओळखण्यासाठी, समजून घेण्यासाठी, एकमेकांना वेळ देण्यासाठी मधुचंद्र हे छान निमित्त ठरु शकतं.
एकमेकांशी नव्याने ओळख – आम्ही एकमेकांना बरीच वर्ष डेट करत होतो. लग्नाआधी आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटायला जाताना आपण नेहमी चांगल्या मूडमधे असतो. तेक्हा आपल्याला एकमेकांच्या चांगल्या-चांगल्याच गोष्टी माहीत असतात. पण लग्नानंतर रोजच्या जगण्यात रुसवे-फुगवे कळू लागतात.
किती दिवस द्यावेत… – एकमेकांना समजून घेण्यासाठी काही वेळेला आयुष्य कमी पडतं तर काही वेळेला दोन दिवसांतही एखादा माणूस पूर्ण कळतो. त्यामुळे हे प्रत्येक माणसावर अवलंबून असते.
तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – तिकडची ’नासी गोरेंग’ नावाची नूडल्सची डिश मला आवडली होती. खरंतर तिथे मासे खूप छान मिळतात. आपल्या इथे वडापावच्या गाडय़ा लागतात तशा तिथे सी फूडच्या गाडय़ा लागतात.
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसिजम – अनोळखी ठिकाणी रोमॅन्टिजम असू शकतो. त्यात सुहृदसोबत असेल तर मजाच मजा. तो माझा चांगला मित्र आहेच. त्यामुळे तो सोबत असताना आम्ही खूप धमाल करतो.
जोडीदाराची खास आठवण? – एकदा सुरुचे मोजे मी उशीखाली लपवून ठेवले होते. त्यावेळी त्याने सगळीकडे मोजे शोधले. त्याने मला मोज्यांबद्दल विचारल्यावर मी त्याला बोलले एकाच बॅगेत सगळं सामान आहे आणि तुला मोजे सापडत नाही. तो बराच वेळ शोधून थकला. शेकटी मोजे मी हळूच पुन्हा बॅगेत ठेवले आणि त्याला बोलायला लागले. त्याची छान गंमत केली होती.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – तो जसा होता अगदी तसाच आहे. त्यात काहीच बदल झालेला नाही. त्याला मी पहिल्या दिवशी भेटले होते अगदी तसाच आहे आणि त्याने तसेच राहावे असेच मला काटते. तो अत्यंत हुशार आहे. तो प्रचंड वाचतो, त्याच्यासोबत बोलताना खूप मजा येते, बुद्धी ला चालना मिळते. तो माझा पार्टनर आहे. पण आम्ही कामाच्या बाबतीच फार स्वतंत्र विचारांचे आहोत. पण आमच्या मुलाची आणि घराची जबाबदारी आम्ही वाटून घेतली आहे. एकाला काम असल्यास दुसरा जबाबदारी सांभाळून घेतो.

आपली प्रतिक्रिया द्या