एकमेकांना वेळ दिला : अद्वैत दादरकर-भक्ती देसाई

790

मधुचंद्र म्हणजे – मधुचंद्र म्हणजे नवरा-बायकोची ओळख होणं. एकमेकांना वेळ देणं.

फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – आम्ही फिरायला सिंगापूरला गेलो होतो. आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर आमचे दोघांचे स्वभाव लक्षात घेता आम्हाला दोघांनाही निसर्गात रमण्यापेक्षा कुठेतरी थरार अनुभवायला जास्त आवडतात.
आवडलेले ठिकाण? – सेन्टोसा आयलंडवर युनिव्हर्सल स्टुडिओ.
ठिकाणाचे वर्णन – सिंगापूरमधील सेन्टोसा आयलंडवर युनिव्हर्सल स्टुडिओ हे ठिकाण फार आवडले. मनोरंजन आणि थरार याचा एकत्र अनुभव आला. गूढता, वेग, साहस यांची आवड असणाऱयांसाठी युनिव्हर्सल स्टुडिओ सगळे अनुभव भरभरून देत असतो.
मधुचंद्रासाठी शॉपिंग – आम्ही तिथे काहीच शॉपिंग केली नाही. आम्ही तिथे एकमेकांसोबत निवांत वेळ घालवला.
मधुचंद्र हवाच की… – हो, असायलाच हवा. मला तर असे वाटते की, लग्नावर भरपूर खर्च करण्यापेक्षा ते साध्या पद्धतीने करून मधुचंद्रासाठी पैसे खर्च करावेत. नवीन ठिकाण पाहता येते, अनुभवता येते आणि एकमेकांना वेळ देता येतो.
एकमेकांशी नव्याने ओळख – नव्याने ओळख अशी नव्हती. आम्ही कॉलेजपासून एकमेकांना डेट करत होतो. मी महाविद्यालयात असताना नाटकाचे दिग्दर्शन करायचो आणि ती अभिनय करायची. त्यामुळे तिच्या मोबाईलमध्येही माझा नंबर ‘गुरू’ या नावाने सेव्ह होता. आमच्यात मैत्रीचे नाते आहे. आता आम्ही नवरा-बायको आहोत. यात अपेक्षा आहेत, रुसवे फुगवे आहेत. त्यातच खरी गंमत आहे आणि त्याचा आम्ही आनंद घेतोय. एकमेकांची स्पेस जपतोय.
एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत… – प्रेमविवाह असेल तर चार-पाच दिवस आणि ठरवून विवाह असेल तर थोडा वेळ लागतो.
तिथली आठवण – आम्ही तिथल्या कॅसिनोत गेलो होतो आणि सगळे पैसे हरलो होतो. फक्त हॉटेलात जाण्यापुरतेच आमच्याकडे पैसे उरले होते. त्यानंतर एकदा सिंगापूरचं लोकल फूड खायचे म्हणून मागवले. समोर कच्चा मासा आणि नुडल्स होते. ती डिशच बघून नकोसे वाटले. त्याचे नावही मला माहीत नाही.
तिथला आवडलेला खाद्य पदार्थ – सगळे सी फूड.
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसिझम – अनोळखी ठिकाण. अनोळखी ठिकाणी एक्स्प्लोअर होता येते. नवीन ठिकाण एक्स्प्लोअर करण्यात वेगळा रोमान्स आहे.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मी जसा आहे तसे भक्तीने मला स्वीकारले आहे. ती फार मोकळ्या मनाची आहे. तिच्यासमोर कुठल्या गोष्टीचा आव आणावा लागत नाही. खरं तर ती फार संवेदनशील आहे. अर्थात ते खूप आवश्यक आहे. थोडासा विसराळूपणा आहे. ती घर, मुलगी आणि त्याबरोबर काम अशा तिहेरी भूमिका अगदी नीट पार पाडत असते. आमच्यात चांगली मैत्री आहे. एकमेकांचे गुण-दोष आम्हाला माहीत आहेत, पण तितका समजूतदारपणा आमच्या नात्यात आहे आणि तोच टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कायम असेल.

आपली प्रतिक्रिया द्या