माझा Fantastick नवरा : फुलवा खामकर- अमर खामकर

353

फुलवा अमर खामकर. 20 वर्षांपूर्वी पहिला मधुचंद्र पचमढीला… आणि आता लंडनला!!

मधुचंद्र म्हणजे? – माझ्यासाठी मज्जा, धमाल आणि एक पिकनिक होती. कारण लग्नाच्या नऊ वर्षे आधी आम्ही एकमेकांना ओळखायचो. वयाच्या पंधराव्या वर्षापासून आम्ही एकत्र होतो आणि चोवीसाव्या वर्षी आम्ही लग्न केले.
फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? – मध्य प्रदेशातील पचमढी, जबलपूर आणि खजुराहो या ठिकाणी फिरायला गेलो होतो. फिरायला जाण्याचे प्लॅनिंग असे केले नव्हते, पण माझी आई या ठिकाणी जाऊन आली होती. त्यामुळे तिचा अनुभव ऐकून तिथेच जायचे असे ठरवले होते.
गमतीदार किस्सा – आम्ही पचमढीला बोटिंगसाठी गेलो होतो. मी आणि अमर एकमेकांवर पाणी उडवत होतो, मध्येच फोटो काढत होतो आणि त्या धमालमस्तीमध्ये पाणी उडवत असताना माझी साखरपुडय़ाची अंगठी पाण्यात पडली. हनिमुनचा दुसराच दिवस होता. बरं त्या एवढय़ा पाण्यात अंगठी शोधणार कुठे? तरीही थोडा प्रयत्न केला, पण सगळं व्यर्थ होतं. घरी काय उत्तर द्यायचे या भीतीने रडूच कोसळंल. घाबरून माझ्या आईला फोन करून हा प्रकार सांगितला. सासू काही बोलली तर या भीतीने आईला सांगितले ज्या ज्वेलर्सकडून ती अंगठी घेतली त्याच्याकडे जाऊन तशीच डिझाईन बनवायला सांग. पण काही कारणाने त्याच्याकडे माझी आधीची डिझाईन सापडत नव्हती. त्यामुळे घरी काय उत्तर द्यायचे कळत नव्हते. जेव्हा घरी आलो त्यावेळी सासूबाई आल्या आल्याच बोलल्या, फुलवा तुझ्या अंगठीची डिझाईन इतकी लोकांना आवडली की त्या ज्वेलर्सकडे तशीच डिझाईन बनवून घेण्यासाठी एक माणूस आला होता. तुझी अंगठी दे आपण त्यांना दाखवूया असं बोलल्यावर. अखेर त्यांना अंगठी पाण्यात पडल्याचे सांगितले. सुदैवाने त्या काही बोलल्या नाहीत, पण तो किस्सा कायम माझ्या लक्षात राहिला.
आवडलेलं ठिकाण? – पचमढी. आम्ही दोघंही खवय्ये आहोत. आमचं साधं हॉटेल होतं. तिथे आम्ही सकाळी साडेसहा-सातला उठून चालायला जायचो आणि आल्यावर गरम गरम पराठे आणि दही खायचो. ती चव आजही जिभेवर रेंगाळतेय.
ठिकाणाचे वर्णन – खजुराहोची मंदिरं मला खूप आवडली. त्याच्यावरची शिल्पकला पाहिल्यावर त्यावेळच्या शिल्पकारांचे खरेच कौतुक वाटते. ही शिल्प नजरेत भरून साठवावी तरी कमीच. तिथे मला फार शांतता वाटली. जबलपूरला भेडाघाटला असलेल्या बोटी, तसेच वेगवेगळय़ा रंगांचे संगमरवर हे सगळं डोळे दिपवतं.
काही खास क्षण – खजुराहोचे मंदिर खूप छान आहे. मी तिथे जेव्हा गेले तिथे मी खूप नाचले होते. तेव्हा तिथे कोणी नव्हते. त्याच्यात मी भन्नाट आणि नुकतेच कथ्थक शिकतही होते. त्यामुळे त्या मंदिरात खूप नाचून घेतले होते.
मधुचंद्र हवाच की… – हवाच. एकमेकांसोबत वेळ घालवता येतो. एकमेकांना समजून घेता येतं. अमरला फिरायला आवडतं. वीस वर्षांपूर्वी आम्ही दोघं मधुचंद्रासाठी पचमढीला गेलो होतो, वीस वर्षांनंतर आम्ही नुकतेच लंडनला आमच्या पिल्लूसोबत गेलो होतो. त्यासाठी वीस वर्षे गेली.
एकमेकांशी नव्याने ओळख – एकट फिरण्याचे स्वातंत्र्य आम्ही उपभोगले होते. एकमेकांशी नव्याने ओळखीचा चान्सच नाही. आम्ही बरीच वर्षे एकमेकांना ओळखत असल्याने आम्हाला एकमेकांचे स्वभाव चांगलेच माहीत होते, पण अजूनही दरदिवशी आमची एकमेकांशी नव्याने ओळख होत असते.
तिथली आठवण – खजुराहोला गेलो तिथे आम्हा खामकरांना खूप लोक ओळखतात. त्यामुळे ओ खामकर अशा बऱयाच हाका यायच्या. मग त्यांच्यात सहभागी होऊन बसायचो. मला नेमके कळायचेच नाही नक्की हनिमुनला आलोय की फेरफटका मारायला. जिथेतिथे ओळखीची माणसे भेटत होती. पण गंमत होती.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – वीस वर्षांपूर्वी अमर जसा मला भेटला होता अगदी तसाच आहे. मी खूप बदलले आहे. तेव्हाही तो कायम माझ्यासोबत असायचा आणि आजही अगदी तसाच आहे. माझ्या सगळय़ा व्यावसायिक आणि वैयक्तिक कामांमध्ये तो कायम माझ्यासोबत असतो. आपल्या आईबद्दल नेहमी बोलतो की घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी… हे आम्ही अमरला बोलतो. तो कुठेही असला तरी त्याचं सगळं लक्ष आसमा आणि माझ्यावर असतं. करीअरच्या सुरुवातीच्या काळात नाचामध्ये, जिम्नॅस्टिकमध्ये तो कायम माझ्यासोबत उभा होता. लग्नानंतर आम्ही एकत्रच असल्याने बऱयाच व्यावसायिक निर्णयात तो माझ्यासोबत असतो अगदी आजतागायत. तो फॅन्टॅस्टिक नवरा आणि केअरिंग बाबा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या