निवांत गप्पांमधून खास क्षण-: लीना भागवत-मंगेश कदम

177

मधुचंद्र म्हणजे – मधुचंद्राची संकल्पना प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते . एकमेकांना समजून घेणे.. एकमेकांना वेळ देणे … आता आयुष्यभरासाठी आपण एकत्र आहोत याची शाश्वती देण्यासाठी पूर्वी मधुचंद्राची सुरुवात झाली… पण लव्ह मॅरेज या संकल्पाने नंतर या सगळ्या पूर्तता आधीच होऊ लागल्या आहेत.. मुळात मी तुला तुझी स्पेस देईन तू मला माझी स्पेस दे. या थोडं अंतर ठेऊन असलेल्या अटीवरच तरुण पिढी लग्नाला तयार होऊ लागली. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तर मधुचंद्र ही संकल्पना बसते का? हा एक प्रश्न आहे. त्यामुळे माझ्यासाठी माझा मधुचंद्र म्हणजे शूटिंग मधून मला कन्फर्म सुट्टी मिळाली आहे त्यामुळे मी माझ्या नवऱयाबरोबर फिरायला जाऊ शकते इतका साधा होता.

फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले – खरं तर मला निसर्ग आवडतो, पण झाडाझुडपांचा… समुद्राबद्दल तितकंसं आकर्षण नाही. मंगेश यांनाही हे माहीत होते. त्यात माझा असा अट्टाहास होता की, तिथे मोबाईलला रेंज नको. हे सगळं ठरवून मग आमचा मित्र वैभव कामत याने दहाव्या मिनिटाला केरळ वायनाड बुक करून दिले होते.
आवडते ठिकाण – तिथले चहा-कॉफीचे मळे.
ठिकाणाचे वर्णन – शुद्ध. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण नाही, इतकं शुद्ध तिथलं वातावरण आहे. त्यामुळे आलेली सात्त्विकता, कोणालाही घाई नव्हती. झाडांचे हिरवे रंग, स्वच्छ, शुभ्र, सुंदर, निरभ्र… असे ते ठिकाण होते. त्या वातावरणात एक वेगळा सुगंध होता. ज्याचे अत्तर शोधून सापडणार नाही.
तिथे केलेली शॉपिंग – माझ्यासाठी तिथली साऊथ इंडियन साडी घेतली होती. आजही ती तश्शीच कपाटात आहे. त्याची घडीही मोडलेली नाही. तसेच दोन लुंग्या घेतल्या होत्या.
काही खास क्षण – आमचे हॉटेल डोंगरावर होते. तो डोंगर उतरून मला दुसऱया डोंगरावर जायचा मोह झाला. पण मंगेशमध्ये तेवढा स्टॅमिना नव्हता. शेवटी मी डोंगर चालत होते आणि मंगेश माझ्या वेगाला धरून जीपने येत होता. त्यावेळी खूप मजा आली होती. त्यामुळे आम्ही राहात असलेले ठिकाण मला आवडले होते.
मधुचंद्र हवाच की – माझा प्रेमविवाह असल्याने मंगेश माझ्या परिचयाचे होते. पण सगळय़ांच्याच बाबतीत ते शक्य असते असे नाही. अशावेळी एकमेकांना समजून घेण्यासाठी जो एकांत लागतो त्यासाठी मधुचंद्र लागतोच.
एकमेकांशी नव्याने ओळख – त्याच्यासाठी मधुचंद्राची गरज नाही. पण दैनंदिन जीवनातील एकमेकांच्या सवयी कळायला लागल्या. एखादी खटकणारी गोष्ट आपल्या जोडीदाराला सांगितली आणि त्याने ती समजून घेऊन त्यात सुधारण्याचा प्रयत्न केला तर खऱया अर्थाने मधुचंद्र सार्थकी लागतो.
एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत- मला वाटतं काही वेळा एखाद्याला आपण मिनिटात ओळखतो आणि काही वेळा एखाद्याला ओळखायला युगानुयुगे लागतात.
तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहात होतो ते डोंगरावर होते. मी कधीच चहा पित नाही. पण तिथल्या वातावरणात त्या डोंगरावर चहा प्यायले होते. तो मला खूप आवडला होता. तो अमृततुल्य आहे.
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिझम – मी प्रचंड घाबरट स्वभावाची असल्यामुळे मी अनोळखी ठिकाणी नक्कीच जाणार नाही. कारण माझ्या मनात सतत प्रश्न असतात. असे झाले तर… तसे झाले तर… त्यामुळे अनोळखी ठिकाण नाही.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोड़ीदार – एक्सलंट. खूपच छान. एक तर आमची दोघांचीही आवडती गोष्ट कॉमन आहे. नाटक… त्यामुळे त्याच्यासोबतचे प्रश्न, टेन्शन, आनंद, उत्सुकता दोघांनाही चांगलीच माहीत आहे. अमुक एका वाक्याला मिळालेली दाद काय असते ते मी समजू शकते. कारण आम्ही दोघेही त्याच क्षेत्रात आहोत. एकाला जरी एखादा अनुभव आला तरी त्याचा प्रत्यय दोघांनाही येतो. इतके आम्ही संसारात समरस पातळीवर आहोत. तू वेळ देत नाहीस ही तक्रार आमच्यात कधीच नसते. त्यामुळे आमचा संसार सुखाचा, आनंदाचा होतो. हां… वाद होतात, पण कुठल्या संसारात ते होत नाहीत? पण मग चूक ज्याची असते त्याने सॉरी म्हणून वाद संपवायचा. मुळात मी चिडकी आणि मंगेश शांत स्वभावाचे आहेत. ते ढाल आहेत, तर मी तलवार… आम्ही एकमेकांना अनेक वर्षे ओळखतोय. त्यामुळे बॅलेन्स नसलेल्या नावेतूनही नीट प्रवास करतोय. एकत्र आहोत म्हणून आम्ही नाटक करतोय.

आपली प्रतिक्रिया द्या