समुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे

204

सारा आणि गणेश… समुद्रावर फुललेली प्रीत

मधुचंद्र म्हणजे – एकत्र सुंदर क्षण आपल्या जोडीदारासोबत घालवणे. अशी जागा जिथे आयुष्यभर आपण ते ठिकाण, तिथल्या आठवणी लक्षात ठेवू शकतो.
प्लॅनिंग कसे केले? – आम्ही मॉरिशसला गेलो होतो. लग्नाच्या नऊ महिने आधी आमचा साखरपुडा झाला होता. साखरपुडय़ानंतर लग्नाचा हॉल बघण्याआधी आम्ही मॉरिशसचे तिकीट बुक करून ठेवले होते. आम्ही दोघांनीही मॉरिशसला जायचे ठरवले होते. ते आमचं स्वप्न होतं.
आवडते ठिकाण – तिथे आम्हाला दोन-तीन ठिकाणं आवडली होती. कलर्ड अर्थ, कसेला वर्ल्ड, कॅमेरलचा धबधबा, तिथले मार्केट… खूप भन्नाट अनुभव होता.
ठिकाणाचे वर्णन – तिथले समुद्र. मी आणि माझा नवरा मुळात मुंबईत राहत असल्यामुळे समुद्र आम्हाला जवळचा. आमची पहिली भेट ही वरळी सी फेसची. आम्ही कधीही भेटायचे झाले तरी समुद्रकिनारी जायचो. त्यामुळे समुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार असल्यासारखे आम्ही मानतो. त्यामुळे मॉरिशस आम्ही निवडले होते. तिकडे गेल्यानंतर दहादिवस ली मॅरिडमध्ये आम्ही राहायला होतो. आमच्या बाजूलाच ली मॉरनी बिच होता. आम्हाला टुर्सवाले न्यायला यायचे. त्यांची वेळ असायची सकाळी 10 ते सायंकाळी 6. मग आम्ही रोज सकाळी 6 वाजता उठून बीचवर जायचो. तिथे आम्ही त्या वाळूत एक झोप काढून यायचो. स्कुबा डायव्हिंग, वेगवेगळे मासे पाहायला मिळाले. पॅरारायडिंग असा थरार अनुभवता आला.
काही खास क्षण – मी माझ्या आयुष्यात कधीही मांसाहार केला नाही. मी प्युअर शाकाहारी होते. मॉरिशस माझ्या कायम लक्षात राहील कारण मी पहिल्यांदा तिथे मांसाहार करायला सुरुवात केली होती. दहाच्या दहा दिवसही मी मांसाहारी खाल्ला.
मधुचंद्र हवाच की… – हवाच. तीच एक प्रत्येक जोडप्यासाठी विशेष मेमरी असते. ती स्वतःसाठी पण आणि इतरांना सांगण्यासाठी पण आठवण असते. माझा वाढदिवस ऑगस्ट आणि त्याचा सप्टेंबरमध्ये असतो. अशा वेळी दरवर्षी मधल्या तारखेला आम्ही फिरायला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊन आमचा मधुचंद्रच अनुभवत असतो. आम्ही एकमेकांसोबत वेळ बाहेर गेल्यावर मिळतो. दरवर्षी आमचा तो प्लॅन असतो. आम्ही दोघंही त्यासाठी वेळ काढतो.
तिथली आठवण – आम्ही तिथे दहाही दिवस बीचवर गेलो होतो. सकाळी पाच-सहाला उठून बीचवर जायचो. थोडा वेळ पाण्यात मजा-मस्ती करून तिथेच थोडा वेळ पहुडायचो. हा आमचा रोजचा प्लॅन असायचा. ते क्षण खूप मिस करते.
तिथला आवडलेला खाद्यपदार्थ – कोळंबी, टुना फिश, बदकाची अंडी आवडली होती.
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसिझम – तसं दोन्ही, पण रोमॅन्टिसिझम जास्त आवडेल. कारण मुळात मी रोमॅन्टिक आहे. अजूनही आम्ही प्रियकर-प्रेयसी असल्यासारखेच वागतो. त्यामुळे कायम मला त्याच्यासोबत रोमॅन्टिक राहायला आवडतं.
जोडीदाराची खास आठवण – माझ्यासाठी त्याने तिथे अनपेक्षित दिलेली डायमण्ड रिंग. तो क्षण फार सुंदर होता.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – आम्ही कधीच एकमेकांना कुठल्या गोष्टीसाठी अडवत नाही. आम्ही इकडे त्याच्या नोकरीसाठी आलो आहोत. तेव्हा त्याने आधीच मला विचारले होते, तुला तुझ्या क्षेत्रात थोडा गॅप घ्यावा लागणार आहे. चालेल का? मलाही ते मान्य होतं. इथे आल्यावरही मला कामांच्या ऑफर येत होत्या. अशा वेळी मी दहा -दहा दिवस मुंबईत जायचे. तेव्हा त्याचे खाण्यापिण्याचे हाल व्हायचे, पण तरीही कुठल्याही प्रकारची चिडचिड न करता तो मॅनेज करायचा. माझ्या गरोदरपणात त्याने घेतलेली काळजी मी कधीच विसरू शकत नाही. गरोदर असतानादेखील सुरुवातीचे तीन-चार महिने मला खूप त्रास व्हायचा. जेवणाचा वासही सहन व्हायचा नाही. अशावेळी त्याने स्वतः किचनचा ताबा घेऊन मला तो रोज यू टय़ूबवर नवीन नवीन रेसिपी पाहून करून घालायचा आणि हे एकदोन दिवस नव्हे, तर सातत्याने तीन महिने. आम्ही दोघंच इथे असल्यामुळे माझे सगळे डोहाळे माझ्या नवऱ्यानेच पुरवले. मी स्वतःला खूप नशीबवान मानते की, मी बोलण्य़ाआधी बरेचसे प्लॅन त्याने केलले असतात. माझी त्याबाबतीत तक्रार नसते.

आपली प्रतिक्रिया द्या