मधुचंद्र : थंडी,.. शांतता… प्रेम!

2076

श्रेया बुगडे–निखिले शेठ. डलहौसीचा बर्फ… एकमेकांना वेळ आणि हवेहवेसे क्षण.

मधुचंद्र म्हणजे – खरं तर आई-वडिलांच्या काळात या वेळेला फार महत्त्व होते. तो काळ वेगळा होता. आता इतक्या सगळ्या गोष्टी पुढे गेल्या आहेत की, कुठेतरी मधुचंद्राचा जो स्पेशलनेस होता तो थोडा कमी झाला आहे. आता आपण इतकं फिरतो, इतकं बोलतो. लग्नाआधी बोलणं, भेटणं बाकी काही नसलं तरी थोडंसं बदललं तरी अजूनही त्याची कन्सेप्ट टिकून आहे.

फिरायला कुठे गेला होतात? ः बाहेर जाण्याचे प्लॅनिंग हे मीच करते. कारण निखिलचं म्हणणं असतं की त्याने केल्यावर ते मला आवडणार नाही. त्यापेक्षा तूच कर. लग्नानंतर आम्हाला सुट्टी फार कमी मिळाली होती. कारण आम्ही दोघंही एकाच शोवर काम करत होतो. त्यामुळे पाच दिवसांसाठी डलहौसीला गेलो होतो. तिथे प्रचंड बर्फ होता. आमचे लग्न डिसेंबरला झाले. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात आम्ही तिथे गेलो होतो. मुळात मला जास्त थंडी सहन होत नाही. त्यामुळे मी फक्त फोटो काढण्यापुरती बाहेर यायचे आणि मग हॉटेलमध्ये थांबायचे. पण धमाल होती. खूप छान दिवस होते. ते जसे दिवस घालवले तेवढा वेळ पुन्हा आम्हाला कधी एकमेकांना देता आला नाही.

तिथे आवडलेले ठिकाण ः डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण आहे. तिथे आम्ही एका डोंगरावर गेलो होतो त्या डोंगरावर जिकडेतिकडे बर्फच होता. त्या थंडीत तो डोंगर चढताना तिथे एक लहान टपरी होती. तिथे आम्ही गरम गरम पराठे आणि तिथले भाज्यांचे लोणचे खाल्ले होते. ते आवडले होते.

ठिकाणाचे वर्णन ः शब्दात नाही वर्णन करता येणार. पण तिथे एक शांतता होती, जी खऱया आयुष्यात नाही. नाहीतर सतत धावपळ, शूटिंग असते. सतत मुखवटे घालून फिरत असतो. डलहौजीमध्ये त्या पांढऱया बर्फाबरोबर जी शांतता होती, ती कुठेच नाही.

काही खास क्षण ः आम्ही जेव्हा हनीमूनवरून परतत होतो तेव्हा फार जास्त बर्फ पडला होता. विमानतळापर्यंत सुखरुप पोहोचू की नाही याची शंकाच मला आली होती. आम्हाला विमानतळापर्यंत रात्रीचा प्रवास करायचा होता. पण माझी नंतर खूप घाबरगुंडी उडाली होती. मध्येच कुठे अडकलो तर त्याची भिती वाटत होती. पण आमचा जो टॅक्सी ड्रायव्हर होता तो म्हणाला, ‘‘मॅडम, तुम्ही काळजी करू नका.’’ मी तिथे पोहोचेपर्यंत जीव मुठीत घेऊन प्रवास केला. पाच दिवस फार मजेत गेले आणि येतानाचा प्रवास घाबरत करावा लागला.

एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत? ः एकमेकांना समजून घेण्यासाठी एक जन्मदेखील पुरेसा नाही. कारण आपल्याला प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रसंगात तो माणूस वेगवेगळा दिसतो. दरदिवशी त्या माणसाबद्दल आपल्याला नवीन गोष्टी कळत जातात. असं होऊच शकत नाही की, एखाद्याला आपण पूर्णपणे ओळखतो.

तिथला आवडलेला खाद्य पदार्थ ः काली डाळ, पराठे आवडले होते.

अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिसिझम ः रोमॅन्टिसिझम. मला वाटते अनोळखी ठिकाण एक्स्प्लोअर करण्यासाठी मी वाईट आहे आणि माझ्या पूर्ण विरुद्ध नवरा आहे. त्याला नेहमी नवीन ठिकाणी जायचे असते.

जोडीदाराची खास आठवण ः डलहौसीमध्ये मायनस टेम्परेचर असल्यामुळे सगळीकडे बर्फच होता. मी इथून थर्मलपासून सगळं घेऊन गेले होते आणि निखिल फक्त पातळ टीशर्ट आणि जीन्स घालून फिरत होता आणि मी कानटोपी, ग्लोव्हज्, आतमध्ये थर्मल होतं. निखिल ओरडत होता, तुझं काय चाललं आहे? मला थंडीचा त्रास असल्यामुळे मी सगळं घालून होते, निखिल पाचही दिवस तसाच फिरत होता.

मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार ः निखिल हा पुण्याचा आहे. त्याच्या स्वभावात आणि रक्तात ‘निवांत’ हा शब्द भिनला आहे. सगळ्याच गोष्टी निवांत असतात, अगदी सुनामी आली तरी तो म्हणेल, ‘‘अगं बसं गं, आता सगळेच बुडणार आहेत. पॅनिक कशाला होतेस? यात अतिशयोक्ती नाही. तो असाच आहे. तो फार निवांत आहे. त्यामुळे 99 टक्के त्याच्या स्वभावाचा फायदाच होतो. आमचं भांडण फार वेळ टिकत नाही. मुळात ते भांडण नसतंच. वन साईड टॉक असतो. त्यात मीच बोलत असते. तो ऐकत असतो. मग मी दमते. तो काहीच बोलत नाही, सगळं झालं की तो बोलतो, ‘‘चल, आता जेवूया का? झालं असेल तर…’’ तो त्याचा चांगलाच गुण आहे. त्याने वाद होत नाही. त्याने मला प्रचंड स्पेस दिली आहे. विशेषकरून त्याचा माझ्यावर असलेला विश्वास आहे. आमच्यात मैत्री आहे म्हणून विश्वास आहे. त्यामुळे मी कुठलाही प्रोजेक्ट घेताना दडपण येत नाही. मी खूप लकी आहे. माझ्यावर पाचशे टक्के विश्वास ठेवणारा जोडीदार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या