महाबळेश्वर आवडते ठिकाण- सुशांत शेलार-साक्षी शेलार

सुशांत आणि साक्षी. आठ वर्षांची मैत्री असूनही महाबळेश्वरी एकमेकांची नव्याने ओळख झाली.

फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कसे केले? आम्ही दोघांनी ठरवून महाबळेश्वरला जायचं ठरवलं होतं. कारण नुकतंच लग्न झालं होतं. शिवाय दोघांचंही फारसं वय नव्हतं आणि लग्नात अफाट खर्च झाला होता. त्यामुळे दोघांनीही जवळच जायचं ठरवलं होतं.

तिथे आवडलेलं ठिकाण? खरं तर आवडण्यासारखे काहीच झाले नाही. कारण त्या वेळी माझी ‘या गोजिरवाण्या घरात’ ही लोकप्रिय मालिका सुरू होती. कुठेही आम्ही बाहेर फिरायला गेलो की लोक फोटो काढायला धावत यायचे. म्हणजे पर्यटक धावत फोटो काढायला यायचे. त्यातल्या काही लोकांनी तर माझ्या हातात त्यांची मुलं आणून दिली. डायरेक्ट हातात कोंबून देत फोटो काढले. चाहत्यांचे एवढे प्रेम पाहून साक्षी थोडी सरप्राईज होती.

ठिकाणाचे वर्णन – आपल्या देशामध्ये ज्यांना-ज्यांना कश्मीर, शिमला, उटीला जावंसं वाटतं, पण शक्य होत नाही, आर्थिकदृष्टय़ाच नाही पण वेळ मिळत नाही असे लोक महाबळेश्वरला आपली हौस पूर्ण करून घेतात. तिथलं वातावरण थंड, निसर्गरम्य आणि आनंददायी आहे. मी अनेक थंड हवेच्या ठिकाणी देशात-परदेशात फिरलो, पण मला अजूनही महाबळेश्वर तितकंच आवडतं. कारण ते महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राचे नंदनवन आहे आणि त्याचा अभिमान आहे.

तिथे केलेली शॉपिंग – तिथे आम्ही फारशी शॉपिंग केली नाही. कारण तिथे लोक फोटो काढण्यासाठी फार हैराण करायचे. पण तिथल्या लोकल गोष्टी घेतल्या, ज्या त्या वेळेला तिथेच मिळायच्या. आता सगळं सगळीकडे मिळतं ही वेगळी गोष्ट आहे.

काही खास क्षण – आम्ही तापोळय़ाला बोटिंगसाठी गेलो होतो. पण आम्ही जेव्हा एक-दीड तासाने फिरून आलो तर साधारण हजार-दोन हजार लोक तिथे उभी होती. त्यांनी जवळजवळ माझी मिरवणूक काढली. तिथल्या प्रत्येक घराघरांत ओटी भरणाचा कार्यक्रम झाला आणि तिथे उन्हाचा इतका त्रास झाला की, संध्याकाळी हॉटेलमध्ये आल्यावर मी आजारीच पडलो. पण लोकांचे प्रेम पाहून भारावूनही गेलो.

मधुचंद्र हवाच की… – असे नाही. कारण मला वाटतं की एवढी लग्नाची धावपळ, दगदग झाल्यानंतर प्रत्येकाच्या मोजक्या सुट्टय़ा असतात. त्यामुळे मला वाटतं थोडा वेळ घेऊन, योग्य नियोजन करून फिरायला गेलेलं बरं असतं. घाईघाईत लग्नानंतर लगेचच फिरायला जायचंच आहे असं काही नाही. वेळ घ्या, मानसिकदृष्टय़ा स्थिर व्हा आणि नंतर मग एकत्र वेळ घालवण्यात जास्त मजा आहे.

एकमेकांशी नव्याने ओळख – आम्ही लग्नाआधी आठ वर्षं एकमेकांना ओळखत होतो. आमची मैत्री होती आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे आठ वर्षं आम्ही एकमेकांना चांगले ओळखत होतो, पण जेव्हा 24 तास एकमेकांसोबत राहायला लागतो तेव्हा आपल्याला माणूस खरा कळतो. खरं तर खरा संसार जेव्हा 24 तास एकमेकांसोबत राहायला लागतो तेव्हा सुरू होतो. आधी मॅटर करत नाही तुम्ही किती वर्षं नात्यात आहात, पण जेव्हा 24 तास एकमेकांना ओळखायला लागता, एकत्र राहायला लागता ते महत्त्वाचे असतं आणि ते 24 तास साक्षीने जास्त जपले. म्हणून आमच्या लग्नाला बारा वर्षं पूर्ण झाली, त्याचं सारं श्रेय मी तिलाच देईन.

एकमेकांना ओळखण्यासाठी किती दिवस द्यावेत? – दिवसांमध्ये नाही मोजू शकत. खरं तर एखाद्याला ओळखायला दहा मिनिटंही लागतात आणि एखाद्याला ओळखायला आयुष्य जातं. तुमचं मन जुळलं पाहिजे, नात्यात समजुतदारपणा हवा आणि हे दोन्ही बाजूने घडायला हवं.

तिथला आवडलेला खाद्य पदार्थ –   कॉर्न टिक्की.

तिथली आठवण – तिथे एका फॅमिलीशी आमची छान ओळख झाली होती. माझ्या मित्राचे मित्र होते. आजही कधी महाबळेश्वरला गेलो की त्यांच्याकडे आवर्जून जाणे होते आणि त्यांच्यासोबतच आयुष्यभराचं नातं जुळलं. मुळात मी नाती जपणारा माणूस आहे, बाकी लोक अशी खूप भेटतात, पण नाती जपणारी खूप कमी असतात.

अनोळखी ठिकाण की रोमँटिसीजम – अनोळखी ठिकाण असेल तर ते जास्त एक्स्पोअर करायला आवडेल. ओळखीचं ठिकाण आपल्याला माहीत असतं आणि अनोळखी ठिकाणी जास्त एकमेकांची सोबत लागते, त्याच्यामुळे रोमँटिक आपोआप होता येतं.

मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार – माझी ती बायकोपेक्षा जास्त मैत्रीण आहे. माझी मुलगी अकरा वर्षांची झाली, मी पंधरा-पंधरा, वीस दिवस बाहेर असतो त्या वेळी माझे बाबा ऍडमीट असायचे आणि मी डे-नाईट शूटिंगमध्ये व्यस्त असायचो तेव्हा सगळं तिनेच सांभाळले आणि आजही माझ्या आईसोबत माझ्यापेक्षा ती जवळ आहे. माझं घर नाही म्हणणार, आमचं घर ती चांगल्या पद्धतीने सांभाळते. ती मैत्रीण नसती तर कदाचित हे झालं नसतं. ज्या वेळेला कडक पाहिजे त्या वेळेला ती कडक होते आणि ज्या वेळेला प्रेमळ त्या वेळेला प्रेमळ असा तिचा स्वभाव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या