विषारी दारू मृत्यूप्रकरणी 9 जणांना फाशीची शिक्षा, 4 महिलांना जन्मठेप

बिहारमधील खजूरबानी विषारी दारू मृत्यूप्रकरणी न्यायालयाने 9 आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली, तर 4 महिला आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गोपालगंज अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

गोपालगंज पोलीस स्थानक परिसरातील खजुरबानी येथे 16 ऑगस्ट 2016 रोजी विषारी दारू प्यायल्याने 19 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 6 लोक कायमचे अंध झाले होते. या प्रकरणी खजुरबानी गावच्या नगीना पासी, रुपेश शुक्ला यांच्यासह 14 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. सुनावणीदरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला होता.

सर्व साक्षिदार तपासल्यानंतर आणि फिर्यादी व आरोपींची बाजू ऐकूण घेतल्यानंतर 13 आरोपींवर दोष सिद्ध झाला. आज 5 मार्चला न्यायालयाने सर्व दोषींना शिक्षा सुनावली. यातील 9 आरोपींना फाशीची तर 4 महिला आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालायने दिली. न्यायालयाने शिक्षा सुनावताच या दारूकांडमध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

अन् अमृताचे आयुष्य उजाड झाले

या विषारी दारूकांडमध्ये खजूरबानी येथील 35 वर्षीय अमृताचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. दोन मुलं आणि दोन मुली असलेल्या अमृताच्या पतीचाही त्या 19 मृतांमध्ये समावेश होता. पतीच्या मृत्यूनंतर तिने सासर सोडले आणि आता ती आपल्या माहेरी आई-वडील आणि मुलांसोबत राहते. सरकारने चार लाखांची मदत दिली, मात्र ही रक्कम बँकेमध्ये फिक्स डिपॉझीट म्हणून ठेवली व महिन्याला 900 रुपये अमृता यांना मिळू लागले. मात्र 900 रुपयांमध्ये चार मुलांचे पोट कसे भरायचे हा प्रश्न त्यांना पडला असून सरकारकडून मदत मिळण्याची आशा त्यांना आहे.

डोळे आणि नोकरीही गेली

या दारूकांडमध्ये कुटुंब उद्ध्वस्त झालेली अमृता एकमेव नाही. बंधू राम हे देखील यास बळी पडले. दारुबंदी असतानाही शेजाऱ्यासोबत लालसेपोटी दारू पिण्यासाठी गेलेल्या बंधू राम यांनी यात आपले डोळे आणि नोकरीही कायमची गमावली. तसेच सरकारने घोषणा केलेली मदतही मिळाली नसल्याची खंत बंधू राम यांनी व्यक्त केली आहे. त्यांना दोन मुली आणि दोन मुलं आहे. त्यांच्या दोन्ही मुली खासगी रुग्णालयात काम करून कुटुंबाचे पालन पोषण करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या