नव्या वर्षाचा भविष्यवेध!! कसे असेल 2019…

3896

>>गितांजली मानकर

नव्या वर्षाच्या स्वागताची आता जय्यत तयारी सुरू झाली आहे. विशेषतः नव्या वर्षाची पूर्वसंध्या. पण नव्या वर्षाच्या पोटात काय दडले आहे याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. आम्ही ‘प्रार्थना’च्या वाचकांसाठी आणला आहे… नव्या वर्षाचा भविष्यवेध!!

मेष

नव्या वर्षात सुरुवातीला आर्थिक स्थिती मजबूत राहील. मात्र खर्च वाढण्याची शक्यता आहे. वर्षाच्या मध्यात (जून-जुलै) व्यवसायात तेजी येईल. त्यामुळे आर्थिक लाभ संभवतो. प्रेमजीवनात खास बदल होणार नाही. तब्येतीच्या छोटय़ा कुरबुरी सोडल्या तर आरोग्य तंदुरुस्त राहील. मेष राशीच्या व्यक्तींना या वर्षी नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ

या वर्षी करीयरबाबत तुम्ही जास्त गंभीर व्हाल. त्यानुसार लक्ष्य मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्नही कराल. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा नक्कीच सुधारेल. त्यातही एप्रिलच्या मध्यापासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत आवक चांगली राहील. जूनपर्यंत हा ओघ सुरूच राहील. मात्र तब्येतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. नव्या वर्षात आरोग्य कमजोरच राहू शकते.

मिथुन

नव्या वर्षात आर्थिक स्थितीबाबत म्हणायचं तर काहीतरी घसघशीत मिळणार आहे. वर्षभर आर्थिक योग कायम राहतील. व्यापारात नवनव्या कल्पना लाभ वाढवणाऱयाच ठरतील. करीयरसाठीही नवे वर्ष उत्तम आहे. पण थोडी जास्तच मेहनत करावी लागेल. आरोग्य ठणठणीत राहील. मात्र वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत तब्येतीची थोडी काळजी घ्या.

कर्क

आर्थिक स्थिती आणि करीयरसाठी नवीन वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींना शानदार असेल. मात्र आरोग्याच्या बाबतीत त्यांनी थोडी काळजी घेणे गरजेचे ठरेल. कारण नव्या वर्षात तब्येतीत चढउतार संभवतात. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक चांगली राहील. याच काळात पगार वाढण्यासारख्या घटनांमुळे हातात पैसा खेळता राहील. मार्चपर्यंत धनहानी होऊ शकते. त्या दरम्यान सावध राहावे लागेल.

सिंह

वर्षाच्या सुरुवातीलाच करीयरमध्ये चांगले परिणाम दिसतील. छोटय़ामोठय़ा आव्हानांना तोंड द्यावे लागेल. फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत पैसा जाण्याची शक्यता आहे. नवीन वर्ष प्रेम जीवनासाठी आव्हानात्मक ठरेल. जोडीदाराशी काही बाबतीत खटके उडण्याची शक्यता. नवीन वर्षात तब्येत मात्र ठणठणीत राहील. वर्षाच्या प्रारंभी सर्दी-खोकल्याची समस्या जाणवेल.

कन्या

नवीन वर्षात कन्या राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात. पण काळजी घ्याल तर त्या दूरही होतील. एकंदरीत संमिश्र प्रकारचे नवे वर्ष असेल. जानेवारी ते मार्च या कालावधीत उत्पन्न चांगले राहील. पण त्याच काळात खर्चही वाढण्याची शक्यता आहे. नोकरी वा व्यवसायामुळे घरापासून दूर राहावे लागण्याचीही शक्यता आहे.

तूळ

नव्या वर्षात करीयरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. मार्चनंतर तुमचे नवे विचार चांगले परिणाम दाखवतील. नव्या वर्षात तूळ राशीच्या व्यक्तींना नवी नाती जोडली जातील. जोडीदाराशी समन्वय चांगला राहील. प्रेमीजीवांसाठी नवे वर्ष अविस्मरणीय ठरेल. घरात एखादे मंगलकार्य होऊ शकते. 2019मध्ये आरोग्य चांगले राहील, मात्र आर्थिक बाबतीत ते वर्ष संमिश्र असेल.

वृश्चिक

नव्या वर्षात आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगायला हवी. फिटनेसबाबत सतर्क राहा. फेब्रुवारी आणि मार्च या काळात तब्येत थोडी नाजूक राहील. करीयरबाबत म्हणायचं तर काही चांगल्या संधी उपलब्ध होतील. सध्याच्या करीयरमध्येही यशच संभवते. तरीही त्यापेक्षा चांगल्या संधी मिळतील. आलेल्या नव्या संधी जास्त फायद्याच्या असल्या तरी स्वीकारताना काळजी घ्या म्हणजे झाले.

धनु

नवीन वर्षाच्या सुरुवातीचे काही महिने तब्येत सांभाळावी लागेल. प्रवासात थोडा थकवा जाणवेल. वाहन सांभाळून चालवा. करीयरबाबत म्हणायचं तर आहे ती स्थिती कायम राहील. चढउतार संभवतात. पण मेहनतीचे फळ नक्की मिळेल. नव्या वर्षात प्रमोशन किंवा पगारवाढ संभवते. आर्थिक स्थिती परिस्थितीनुसार ठीक राहील. आईवडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

मकर

नवीन वर्ष मकर राशीच्या व्यक्तींसाठी चांगले असेल. आरोग्याच्या काही कुरबुरी उद्भवू शकतात. 2019मध्ये खर्चात वाढ होऊ शकते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. नोकरी करत असाल तर प्रमोशन किंवा कंपनीतर्फे प्रोत्साहन दिले जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये एखादी खूशखबर मिळू शकते. व्यापारात लाभ होईल. प्रेमजीवन एन्जॉय करा.

कुंभ

आरोग्याच्या बाबतीत नवे वर्ष सुखकारक आहे. नव्या वर्षात करीयरलाही नवी उंची लाभेल. तुमच्याच कार्यक्षेत्रात यश मिळेल. त्यामुळे आनंदात राहाल. या वर्षी आर्थिक लाभाचे योग आहेत. मार्चनंतर आर्थिक स्थितीत चांगला बदल होईल. उत्पन्नाचे अनेक मार्ग समोर येतील. प्रेमजीवनही आधीच्या वर्षाच्या तुलनेत चांगले दिसते. वर्षाची सुरुवात थोडी धीमी असली तरी मार्चपर्यंत प्रेमजीवन फळफळेल.

मीन

येत्या नवीन वर्षात तब्येत चांगली राहील. पण तरीही आरोग्याबाबत गंभीर राहावे लागेल. 2019 मध्ये करीयर नव्या उंचीवर पोहोचेल. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला नवी ओळख मिळेल. आर्थिक समस्या भेडसावू शकतात. त्यामुळे पैशाचे व्यवहार जपून करा. प्रेमजीवनाबाबत म्हणायचं तर थोडा संभ्रम असेल. आपल्या नात्याबद्दल काही शंका उगीचच मनाला सतावत राहतील.

आपली प्रतिक्रिया द्या