रविवार ८ ते शनिवार १४ ऑक्टोबर २०१७

  • नीलिमा प्रधान

मेष – मनोबल वाढवा

अडचणी निर्माण करण्याचा व तुमचे मनोधैर्य कोणत्या घटनेने खचेल याचा प्रयत्न चहूबाजूंनी केला जाईल. तुमचे मानसिक बळ मात्र टिकून राहील. वाटाघाटीत तणाव व वाईटपणा स्वीकारण्याची वेळ येईल. कुटुंबात तुमचे मत पटवणे कठीण आहे. समस्या वाढतील. प्रतिष्ठा टिकवण्याचा प्रयत्न करा. शुभ दिन : ९,१०.

वृषभ – परिश्रमांचा कस लागेल

महत्त्वाची भेट घेऊन कठीण काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात आहे ती परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मेहनत करून तुमचे अस्तित्व टिकवायचे आहे. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या व निर्णय ठरवा. नाट्य-चित्रपट क्षेत्रात नावलौकिक मिळू शकेल. शुभ दिन : ११,१२.

मिथुन – संयम बाळगा

आठवडय़ाच्या सुरुवातीला संतापजनक घटना कुटुंब, नोकरी व व्यवसायात घडू शकते. संयम ठेवा. तुमचा प्रभाव टिकवण्याचा प्रयत्न करता येईल. हे सर्व तात्पुरते असेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर टीका होईल. अनाठायी खर्च करावा लागेल. गुंतवणूक करताना चौकस बुद्धी वापरा. शुभ दिन : १३,१४.

कर्क – नवीन संधी मिळतील

व्यवसायात जम बसवता येईल. आठवड्याच्या मध्यावर किरकोळ वाद भागीदाराबरोबर होईल. कुटुंबात शुभ समाचार मिळेल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे यशस्वीपणे मांडता येतील. वर्चस्व सिद्ध करता येईल. शिक्षण, नोकरीसाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. परिचय होतील. शुभ दिन : ८,९.

सिंह – योजना मार्गी लागतील

कठीण वाटणारे व दडपण आणणारे काम पूर्ण करता येईल. प्रेमाने व सलोख्याने वागा. कोर्ट केसमध्ये अडचण येऊ शकते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व पाहून विरोधक सावध होतील. व्यवसायातील योजना मार्गी लागतील. नावलौकिक मिळेल व उत्तम आर्थिक लाभ मिळेल. शुभ दिन : ९,११.

कन्या – मनासारख्या घटना घडतील

विचारांना दिशा मिळेल. अडचणीत आलेले प्रश्न मार्गी लागतील. या आठवड्यात मनाप्रमाणे घटना सर्वच क्षेत्रांत घडतील. व्यवसायात योग्य निर्णय घ्याल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात पाहिजे ते घडण्याची आशा निर्माण होईल. मोठे आश्वासन मिळेल. अहंकार मात्र ठेवू नका. कोर्ट केसची चिंता मिटेल. शुभ दिन : १३,१४.

तूळ – तडजोडींचा काळ

हवा येईल तशी पाठ फिरवण्याशिवाय पर्याय नसेल. सर्वच ठिकाणी तडजोड करावी लागेल. कौटुंबिक ताणतणाव वाढेल. जबाबदारीने वागावे लागेल. कोणत्याही क्षेत्रात उतावळेपणा व अति आत्मविश्वास ठेवणे प्रतिष्ठेला धोकादायक ठरू शकते. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांची नाराजी होईल. शुभ दिन : ११,१२.

वृश्चिक – जबाबदारी वाढेल

व्यवसायात पूर्वी घेतलेला अंदाज अचानक बदलू नका. चूक होऊ शकते. कौटुंबिक ताण-तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा. राजकीय – सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेण्यास वेळ लावू नका. प्रतिष्ठा कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वर्चस्व वाढेल. नवीन जबाबदारीचे काम स्वीकारावे लागेल. शुभ दिन : ९,१०.

धनु – विचारपूर्वक निर्णय घ्या

तुम्ही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून काही निर्णय घेता; परंतु या आठवडय़ात तुमचे मन अस्थिर होईल. वाटाघाटीसंबंधी चर्चा करताना एखादा विचार तुम्हाला त्रस्त करणारा असू शकतो. व्यवसायात चढ-उतार राहील. प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत तडजोड करावी लागेल. कलाक्षेत्रात काम मिळेल. शुभ दिन : ११,१२.

मकर – सकारात्मक कालावधी

आठवड्याच्या शेवटी तुमची अनेक क्षेत्रांतील अनेक कामे मार्गी लागतील. विचारांना व योजनेला चालना मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांना कमी लेखू नका. तुमची घोडदौड सुरू राहील. कुटुंबात आनंद वाढेल. खरेदी-विक्रीत फायदा होईल. जुने वाद दूर होतील. व्यवसायात नव्या दिशेने वाटचाल होईल. शुभ दिन : १३,१४.

कुंभ – मनोबल राखा

राजकीय क्षेत्रात तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा ठरविण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमचे मुद्दे अवास्तव वाटू शकतात. तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. जवळच्या माणसाची चिंता वाटेल. कोणत्याही क्षेत्रातील महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका व घेतलेला निर्णय बदलण्याची घाई करू नका. शुभ दिन : ८,११.

मीन – कर्तव्याला प्राधान्य

बिघडलेले नाते अथवा व्यवसायातील करार नव्याने करण्यात यश मिळेल. जिद्द ठेवा. भावना व कर्तव्य यांची गल्लत करू नका. जमिनीचा व्यवहार मार्गी लावता येईल. राजकीय – सामाजिक क्षेत्रात मेहनत केल्याचे श्रेय तुम्हाला मिळू शकेल. रेंगाळत पडलेली कामे पूर्ण करा. नावलौकिक वाढेल. शुभ दिन : १३,१४.