भविष्य : रविवार ११ ते शनिवार १७ मार्च २०१८

74

>> नीलिमा प्रधान

मेष – मनाच्या शक्तीचा फायदा होईल
मेषेच्या व्ययेषात सूर्यप्रवेश व चंद्र, गुरू लाभयोग होत आहे. मनाची शक्ती कोणत्याही प्रसंगात अत्यंत महत्त्वाची असते. त्याचाच फायदा राजकीय क्षेत्रात मोठा निर्णय घेताना होईल. विरुद्धलिंगी व्यक्तीपासून थोडे दूर रहा. गोड बोलून तुमचा पैसा आणि वेळ काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. चौकस रहा. शुभ दि. – ११, १२.

वृषभ – मानसन्मानाचा योग
वृषभेच्या एकादशात सूर्यप्रवेश आणि मंगळ-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. कौटुंबिक समस्येला अचानक कलाटणी मिळू शकते. मानसन्मानाचा योग येईल. राजकीय क्षेत्रात गुंतागुंत वाढवू नका. धंद्यात स्थिरता येईल. विद्यार्थीवर्गाने ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. प्रवासात दुखापत संभवते. शुभ दि. – १३, १४.

मिथुन – धैर्याचे कौतुक होईल
मिथुनेच्या दशमेषात सूर्यप्रवेश व सूर्य त्रिकोणयोग होत आहे. नोकरीत तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. वरिष्ठांना खूष कराल. धैर्याचे कौतुक होईल. राजकीय क्षेत्रात पक्षाचे नेतृत्व खंबीरपणे पेलवून धरता येईल. दर्जेदार लोकांचा सहवास होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. स्वप्न पूर्ण करू शकाल. शुभ दि. – १५, १६.

कर्क – थोडा संयम ठेवा
कर्केच्या भाग्येषात सूर्यप्रवेश आणि चंद्र शुभलाभ योग होत आहे. राजकीय क्षेत्रात यश तुम्हाला कक्षेत दिसत असले तरी थोडा संयम ठेवा. तुमच्या डावपेचांचा परिणाम दिसण्यास थोडा वेळ लागेल. सामाजिक कार्यात विरोधक आक्रमक होतील तर काही तह करण्यास येतील. उतावळेपणा करू नका. शुभ दि. – ११, १४.

सिंह – प्रकृतीची काळजी घ्या
सिंह राशीच्या अष्टमेषात सूर्यप्रवेश आणि शुक्र-शनी केंद्रयोग होत आहे. कुटुंबात दुरावा आणि तणाव निर्माण होईल. आपापसात मतभेद होतील. सर्व खापर तुमच्यावर फोडण्याचा प्रयत्न होईल. राजकारणात तुमचे मुद्दे इतर पक्ष घेतील. मंगळवार, बुधवार प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दि. – ११, १२.

कन्या – परिस्थितीचे निरीक्षण करा
कन्या राशीच्या सप्तम स्थानात सूर्यप्रवेश आणि चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात तुमच्याबद्दलचा गैरसमज दूर होण्याची शक्यता निर्माण होईल. तुम्ही संयम व श्रद्धा ठेवा. परिस्थितीचे निरीक्षण करा. पुढे संधी मिळेलच. कुटुंबातील व्यक्ती तुमच्या सोबत असतील. शुभ दि. – १३, १४.

तूळ – स्थिर विचाराने निर्णय घ्या
तुळेच्या षष्ठ स्थानात सूर्यप्रवेश आणि चंद्र-मंगळ लाभयोग होत आहे. तुमच्या उत्साहावर एखादी व्यक्ती टीका करण्याची शक्यता आहे. ठरवलेली योजना घरातील व्यक्ती पूर्ण करीलच असे समजू नका. राजकारणात विरोधक मैत्रीसाठी येतील, मात्र सावध रहा. कुटुंबात स्थिर विचाराने निर्णय घ्या. शुभ दि. – ११,१२.

वृश्चिक – अंदाज बरोबर येईल
वृश्चिकेच्या पंचमेषात सूर्यप्रवेश आणि चंद्र-बुध लाभयोग होत आहे. शेअर्समध्ये तुमचा अंदाज बरोबर येईल. नुकसान भरून काढता येईल. प्रतिष्ठा टिकवता आली तरी संघर्ष कायम राहील. नवे मित्र जोडले जातील. घर, जमीन इत्यादी व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. – १२,१३.

धनु – विरोधकांना धडा शिकवाल
धनु राशीच्या सुखेषात सूर्यप्रवेश आणि सूर्य – गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय क्षेत्रात उत्साहवर्धक घटना घडेल. तुम्हाला तुमच्या पद्धतीने विरोधकांना धडा शिकवता येईल. चमत्कारजन्य यश मिळेल. व्यावहारिक दृष्टिकोन मात्र ठेवा. सर्वत्र कौतुक होईल. कला, क्रीडा क्षेत्रात आघाडीवर राहाल. शुभ दि. – १३,१५.

मकर – प्रगतीचा घोडा वेगाने धावेल
मकरेच्या पराक्रमात सूर्यप्रवेश आणि चंद्र-बुध लाभयोग होत आहे. आठवडय़ाची सुरुवात अडचणी निर्माण करणारी असली तरी मंगळवारपासून तुमच्या प्रगतीचा घोडा वेगाने धावेल. राजकीय क्षेत्रात नवे डावपेच टाकता येतील. सामाजिक कार्यात रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात सुखाचे क्षण येतील. व्यवसायाला कलाटणी मिळेल. शुभ दि.- १५,१६.

कुंभ – वेळेचा फायदा घ्या
हाती घेतलेले काम आत्मविश्वासाने आणि धैर्याने पूर्ण कराल. कुंभेच्या धनेषात सूर्यप्रवेश आणि चंद्र-मंगळ लाभयोग होत आहे. विचारांना चालना मिळेल. लोकसंग्रहाचे वर्तुळ अधिक मोठे होईल. प्रयत्न करा. वेळ कमी असतो हे गृहीत धरून वेळेचा फायदा घ्या. मंगळवार, बुधवार गुप्त कारवाया उघड होतील. शुभ दि. – ११,१२.

मीन – रेंगाळलेली कामे मार्गी लागतील
स्वराशीत सूर्यप्रवेश आणि शुक्र-शनी केंद्रयोग होत आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. राजकीय क्षेत्रात अधिकारप्राप्तीची शक्यता वाढेल. कोर्ट केसमध्ये गाफील राहू नका. गुरुवार, शुक्रवार गुप्त कारवायांचा त्रास होईल. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. – १३,१४.

आपली प्रतिक्रिया द्या