
दुबईमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात 7 हिंदुस्थानी कामगारांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. एमिरेट्स रोडवर तांत्रिक बिघाडामुळे रस्त्याच्या मध्यभागी थांबलेल्या ट्रकला मिनीबसने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक अचानक बंद पडल्याने तो रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिला होता. प्राथमिक तपासात मिनीबस चालकाने सुरक्षित अंतर न ठेवल्याने आणि वेळीच वाहनावर नियंत्रण न मिळवल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
या अपघातात 7 हिंदुस्थानी कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 5 जण गंभीर तर 4 जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच दुबईतील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाचे अधिकारी रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमी हिंदुस्थानींची भेट घेतली तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे. असे वृत्त एनडीटीव्ही ने दिले आहे.
हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने सोशल मीडियावरील निवेदनात या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “या दुर्दैवी अपघातात जीव गमावलेल्या हिंदुस्थानी नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. जखमींना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाईल,” असे दूतावासाने म्हटले आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी दुबई पोलिसांच्या वाहतूक अपघात तपास विभागाने सखोल चौकशी सुरू केली आहे. बचाव पथकांनी घटनास्थळी तत्काळ मदतकार्य राबवत वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघातग्रस्त ट्रक आणि मिनीबस हटवली. ही घटना दुबईतील हिंदुस्थानी कामगार समुदायासाठी मोठा धक्का मानली जात असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


























































