अमेरिकेत वाळूच्या वादळामुळे भीषण अपघात, 22 वाहनांची धडक; 8 ठार

अमेरिकेतील उटाह येथे अचानक आलेल्या वाळूच्या वादळामुळे भीषण अपघात झाला. उटाह महामार्गावर आलेल्या वाळूच्या वादळामुळे 22 वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात चार मुलांसह आठजण ठार झाले आहेत. या अपघातात एका मालवाहू ट्रकला अनेक कार धडकल्या.

रविवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रविवारची सुट्टी संपवून अनेकजण घरी परतत असल्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक होती. अचानकपणे वाळूचे वादळ आल्याने वाहनचालकांना काहीच दिसले नाही. त्यामुळे वाहने एकमेकांना धडकली.

या अपघातानंतर किमान 10 लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी आठजणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी पाचजण एकाच कारमधील होते, तर अन्य मृत दुसऱ्या वाहनातील होते. मृतांमध्ये दोन वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे मोठ्या प्रमाणावर वाहने एकमेकांवर आदळली. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूककोंडीही झाली. अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या मदतीने हटविण्यात आले. वाहने हटविण्यासाठी काही वेळेसाठी महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या