रुग्णालयांतील बायोमेट्रिक हजेरी बंद करा! पालिका कर्मचारी संघटनांचा सोमवारी ठिय्या आंदोलनाचा इशारा

545

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, संसर्ग होऊ नये, यासाठी पालिका रुग्णालयांतील बायोमेट्रिक हजेरी तुर्तास बंद करा, या मागणीसाठी पालिका कामगार-कर्मचारी संघटना सोमवारी ठिय्या आंदोलन करणार आहेत. पालिका आणि राज्य सरकारने याची दखल घ्यावी, यासाठी हे आंदोलन करणार असून त्यामुळे रुग्णालयातील कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे कामगार-कर्मचारी संघटनांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिका कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करून त्यांना मस्टरवर हजेरी लावण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, 6 जुलैपासून पुन्हा बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. कामगार संघटनांनी या निर्णयाला विरोध केल्यानंतर पालिका प्रशासन आणि समन्वय समितीच्या बैठकीत पालिका कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पालिका रुग्णालयांत, आरोग्य खात्यांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी सक्तीची ठेवली होती. या पाश्र्वभूमीवर, रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक असल्यामुळे पालिका प्रशासनाने बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय मागे घ्यावा आणि परिपत्रक रद्द करावे, त्यांनाही पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मस्टरवर हजेरी लावण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन होणार आहे.

या आंदोलनात पालिकेतील म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेना, म्युनिसीपल मजदूर युनियनसह सर्व कामगार-कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या