झणझणीत

174

शेफ मिलिंद सोवनी,[email protected]

जेवण कितीही चांगलं झालेलं असलं तरी त्याला खरी चव येते ती त्यातल्या चटणीमुळे… तिखटमिखट चटणी… मग ती कसलीही असली तरी त्यात ओलं खोबरं आणि लसणाची फोडणी घातली की चटणीला अशी काही चव येते की मग तिच्यासमोर सगळे पदार्थ अक्षरशः फिके वाटायला लागतात. चटणीच्या या झणझणीतपणामुळेच यावेळी तोच विषय घेतलाय.

चटणी या प्रकारात मिरचीचा ठेचाही येतो. मिरचीचा खरडाही येतो. म्हणूनच यावेळी कोल्हापुरी मिरचीचा ठेचा ही खास रेसिपी दिली आहे. त्याबरोबरच हिरव्या टॉमेटोची चटणीसुद्धा दिली आहे. नानबरोबर ती छान लागते. सहसा हिरव्या टोमॅटोचा वापर आपण कुठल्याच पदार्थात करत नाही. म्हणून हेच टोमॅटो वापरले आहेत.

चटणी हा शब्द आणि खाद्यप्रकारही मूलतः अरेबिक किंवा मिडल इस्टमधून आपल्याकडे आलेला आहे. पण साधारणपणे चटणी हा प्रकार ब्रिटीशांचा… ते येथून निघून गेले, पण त्यांनी चटणी मागेच ठेवली असं म्हणता येईल. ब्रिटीश लोक चटण्या बनवतात त्या बहुतांश फळांच्या असतात. त्या आंबटगोड अशा प्रकारच्या असतात. म्हणजेच फळांचं जॅम असेल आणि त्याला आंबटगोड अशी चव असेल तर ते कसे लागेल? तशा प्रकारातल्या चटण्या ब्रिटीश लोक बनवायचे. त्यांच्या या चटण्या जगभर प्रसिद्ध झाल्या. पण आपल्याकडे चटणी म्हटलं म्हणजे साधारणपणे तेलाच्या, चटपटीत, तिखट आणि झणझणीत अशाच असल्या पाहिजेत.

आपल्याकडेही चटण्या वेगवेगळ्या चवीच्या असू शकतात. म्हणजे उत्तरेकडे जाल तर तिकडच्या चटण्या तेवढय़ा तिखट नसतात. त्यांच्याकडे चटण्यांमध्ये पुदिना आणि कैरी घालण्याचा प्रकार जास्त पाहायला मिळतो कारण त्यांच्याकडे चटण्यांपेक्षा लोणच्याला जास्त मागणी असते. त्या लोकांना आचारच लागतो. मीठ घालून खूप दिवस टिकणारे पदार्थ ते करतात. पण जसजसे खाली दक्षिणेकडे म्हणजे बंगाल, महाराष्ट्र येथे याल तर चटणी जास्तीत जास्त तिखट होत जाईल. पण खरडा किंवा ठेचा हा प्रकार हा प्रकार केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाहीय. ठेचा हा प्रकार थेट तामीळनाडू, कर्नाटक, केरळपर्यंत पाहायला मिळतो.

तीळ आणि हिरव्या टोमॅटोची चटणी

साहित्य.. कापलेले हिरवे टोमॅटो पाव किलो, तीळ १ चमचा कोरडे भाजलेले, हिरव्या मिरच्या ३, मीठ चवीपुरते, गूळ १ चमचा किसलेले, तेल २ चमचे, मोहरी १ चमचा, हिंग चिमूटभर.

कृती..प्रथम कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घालून ती तडतडू द्यायची. मग त्यात हिंग आणि हिरव्या घालून तळून घ्यायचे. त्यानंतर त्यात कापलेले हिरवे टोमॅटो घालून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत तेही तळायचे. मग कढई आचेवरून घाली उतरवा. त्यात तीळ, गूळ आणि मीठ घालून एकजीव करायचे. थंड झाल्यावर त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही चटणी कापलेल्या कोथिंबीरीबरोबर वाढायची. रोटीबरोबर उत्तम लागते.

कोल्हापुरी मिरचीचा ठेचा

साहित्य.. हिरव्या मिरच्या ७ ते ८, लसणाच्या ४ ते५ पाकळ्या, खवलेल्या नारळाचे खोबरे दोन चमचे, तीळ १ चमचा, कोथिंबीर चिरलेली २ चमचे, तेल १ चमचा, मीठ चवीपुरते.

कृती..प्रथम कढईत तेल गरम करा आणि त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून ते तळून घ्यायचे. मग त्यात कोथिंबीर, लसूण आणि तीळ घालून २ ते ३ मिनिटे परतून घ्यायचे. त्यानंतर कढई खाली उतरवून त्यात खवलेल्या नारळाचे खोबरे आणि चवीपुरते मीठ घालून चांगले एकजीव करायचे. हा झाला कोल्हापुरी ठेचा… लक्षात ठेवा त्यात पाणी मुळीच घालायचे नाही. हा ठेचा भाकरीबरोबर खायला खूपच छान लागतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या