कोण होणार करोडपतीची हॉटसीट आली प्रेक्षकांच्या दारी

71

सामना ऑनलाईन । मुंबई

कोण होणार करोडपतीचे नवे पर्व जसजसे जवळ येत आहे तसतशी लोकांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे. नागराज मंजुळे सारखा स्टार हा शो होस्ट करत असल्याने आणि टीजर्स आणि टायटल सॉंगमधून दिसणाऱ्या शोच्या आकर्षक स्वरूपामुळे या शोला लोकांनी प्रदर्शनाआधीच डोक्यावर घेतले आहे. त्यातच सोनी मराठीने शोला प्रमोट करायची आजवर कधीही न आजमावली गेलेली अशी हटके शक्कल काढली आहे. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच कोण होणार करोडपतीची ‘हॉटसीट’ स्टुडिओमधून बाहेर पडून चक्क आता वेगवेगळ्या शहरांतून फिरणार आहे.

कोण होणार करोडपतीच्या हॉटसीट वर बसणे हे अनेक जणांचे स्वप्न असते. हॉटसीटवर पोहोचण्यासाठी लोकांना अनेक ऑडीशन, अनेक फेऱ्या यांना मेहनतीने पार करून ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ पोहोचावे लागते आणि त्यानंतरही त्यामध्ये पहिला क्रमांक जो पटकवेल तोच भाग्यवान हॉटसीटवर कोण होणार करोडपतीचा खेळ खेळू शकतो. पण या प्रमोशनमुळे आतातर प्रत्यक्ष हॉटसीटच तुमच्या दारी येणार आहे. इतकेच काय तर सोबत नागराज मंजुळेचा व्हर्चुअल अवतार देखील असेल. त्यामुळे तुम्ही हॉटसीटवर बसू शकता, सेल्फी काढू शकता, आणि इतकेच नव्हे तर कोण होणार करोडपतीचा व्हर्चुअल गेमप्ले देखील खेळू शकता.

थोडक्यात म्हणजे ज्यांना कोण होणार करोडपतीमध्ये प्रत्यक्ष हॉटसीटवर बसायची संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी या शोचा खराखुरा ‘फील’ घ्यायची ही सुवर्णसंधी आहे. 13 ते 17 मे दरम्यान ती मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी अवतरणार आहे. 13 मे रोजी हॉटसीटवर बोरीवली, विरार, नालासोपारा येथील करोडपती बसतील, 14मे रोजी ठाणे तलावपाळी, कल्याण-डोंबिवली परिसरात हॉटसीटसोबत सेल्फी काढता येईल, 15 मे रोजी गोरेगाव, विले पार्ले येथे बुद्धिवंत हॉटसीटवरून प्रश्नाला भिडतील, 16 तारखेला या सिंहासनावर दादर, सिद्धिविनायक, वरळी नाका येथील राजे विराजमान होतील आणि १७ तारखेला प्रेक्षक करी रोड व गिरगाव येथे हॉटसीटवर आरूढ होऊ शकणार आहेत म्हणजेच या ठिकाणी जाऊन कोण होणार करोडपतीचा एक डाव खेळून प्रश्नांना भिडू शकणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या