महागाईचा कहर, डाळी, भाजीपाल्यानंतर हॉटेलिंगही महागले

358
फोटो प्रातिनिधीक

केंद्रातले मोदी सरकार महागाईला लगाम घालण्यात अपयशी ठरले आहे. भाजीपाला, कांदा, अन्नधान्य आणि किरकोळ बाजारात मोठी भाववाढ झाली असून महागाईने अक्षरशः कहर केला आहे. सामान्यांना हॉटेलमध्ये जाणेही परवडणार नाही. कारण हॉटेलिंगही महागले आहे. हॉटेलची ही दरवाढ लवकर कमी होईल अशी चिन्हे दिसत नाहीत.

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरू असून दुसरीकडे अन्नधान्य आणि भाजीपाल्याचेही दर कडाडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होत आहे. कांदा तर शंभरीपार गेला होता. कांद्याने डोळय़ात पाणी आणल्यानंतर हॉटेल मालकांनीही दरवाढ केली. ही दरवाढ अद्याप कायम आहे.

हॉटेलमालकांची गोची
जेवणात कांदा, लसणाच्या फोडणीशिवाय जमू शकत नाही, परंतु गेल्या महिन्यात कांदा शंभरीपार गेल्यामुळे हॉटेल मालकांनी दरवाढ केली. अगदी वडापावचे दरही 12 वरून 15 वर गेले. दरम्यान, कांद्याचे दर आता काही प्रमाणात नियंत्रणात आले असले तरीही भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. त्यामुळे हॉटेलिंग महागले आहे. ही दरवाढ कमी होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल, असे इंडियन हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत शेट्टी यांनी सांगितले.

मांसाहारही महागला
डाळी, भाजीपाल्यासह मासेही महागले आहेत. लहान पापलेट जरी घ्यायचे झाले तरी 600 ते 700 रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे आता मच्छीमार्केटमधली गर्दीही कमी झाल्याचे चित्र आहे. मासे महागल्याचा परिणामही हॉटेलमधील खाण्यावर झाल्याचे शशिकांत शेट्टी यांनी सांगितले. बाजारात मोठय़ा प्रमाणावर मासळी उपलब्ध नसल्याने दर वाढल्याचे मासळी विक्रेते अरुण साजेकर यांनी सांगितले.

मासळीचे दर
(प्रति किलो) आता आधी
पापलेट -800 रुपये -400 रुपये
हलवा – 500 – 300
सुरमई –  400 -250
बोंबील – 200 – 150
रावस – 600  -400

आपली प्रतिक्रिया द्या