हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटकडून पालकांची लूट, ऑनलाइन लेक्चरसाठी लाखो रुपये फी

663

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱया मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचे शिक्षण कोरोना काळात आणखीनच महाग झाले आहे. लॉकडाऊन असल्यामुळे यंदा फी वाढ करू नये असे राज्य सरकारचे आदेश असतानाही शहरातील काही खासगी विनाअनुदानित हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटनी फी वाढ केली आहे. सध्या कॉलेज बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टीकलही बंद आहेत. मात्र तरीही केवळ ऑनलाईन लेक्चरसाठी या इन्स्टिट्यूटकडून लाखो रूपये फी घेतली जात आहे.

विनाअनुदानित संस्थावर शिक्षण विभागाचे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे या संस्थांची फी बाबत अरेरावी पालकांना सहन करावी लागत आहे. ओशिवरा येथील एका हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटने द्वितीय वर्षासाठी एकूण 1 लाख 85 हजार रूपये फी ठरविली असून विद्यार्थ्यांना 20 जूनपर्यंत यातील 1 लाख रूपये फी भरण्यास सांगितले आहे. गेल्यावर्षी प्रथम वर्षासाठी 1 लाख 75 हजार रूपये फी घेतली होती. यंदा या फी मध्ये 10 हजारांनी वाढ करण्यात आली आहे.

निकालासोबतच फी भरण्याच्या सूचना
प्रथम वर्षांची परीक्षा या कॉलेजने ऑनलाईन घेतली. पदार्थ बनविण्याची प्रॅक्टीकल परीक्षाही विद्यार्थ्यांनी स्वतŠ सामान आणून घरातूनच ऑनलाईन दिली. या परीक्षेचा निकालही ऑनलाईन पाठविण्यात आला. या निकालासोबत 1 लाख 85 हजार रूपये फी भरण्याची सूचनाही कॉलेजने केली आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

याला पालकांचा आक्षेप
लॉकडाऊनमुळे कॉलेज बंद आहेत. हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमामध्ये पदार्थ बनविण्याच्या प्रॅक्टीकलला महत्त्व आहे. हे प्रॅक्टीकलच होणार नसेल तर लाखो रूपये फी घेण्यास काय अर्थ आहे

ऑनलाईन लेक्चर वेळी जे प्रॅक्टीकल शिकवले जाते त्यावेळी लागणारे साहित्य विद्यार्थी स्वखर्चाने आणत आहेत. फी भरल्यानंतरही या साहित्याचा खर्च ही विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या