पुणे- कोंढव्यात एकाच इमारतीतील पाच फ्लॅट फोडल्याने रहिवासी दहशतीखाली

अनलॉकनंतर चोरट्यांनी पुण्यात धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कोंढव्यातील एकाच इमारतीतील पाच बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. ही घटना प्रतिमा सोसायटीत घडली असून  याप्रकरणी प्रशांत कुतवळ वय 33, रा. कोंढवा बुद्रूक यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कोंढवा बुद्रूक परिसरातील प्रतिमा सोसायटीत राहायला आहेत. लॉकडाउनमुळे ते मूळगावी गेले होते. याचा फायदा उचलत चोरट्यांनी मध्यरात्री त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिन्यांसह 25 हजारांची रोकड चोरुन नेली. चोरट्यांनी त्याच इमारतीतील आणखी चार बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला याबाबत माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेबाबत बोलताना कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी सांगितले की जिथे चोरीची घटना घडली आहे त्या परिसरात सीसीटीव्ही नसल्यामुळे तपास कार्यात अडथळा येत आहे. मात्र, लवकरच चोरट्यांना अटक केली जाईल.

 कोरोनामुळे पॅरोलवर सुटलेले मोकाट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाच्या भीतीमुळे कारागृहातून सोडण्यात आलेल्या कैद्यांकडून चोरी केल्याचे पोलिसांना काही घटनांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांना बंदोबस्त, नाकाबंदी, पेट्रोलिंग करण्यासोबत कैद्यांवरही लक्ष द्यावे लागत आहे. संधीचा फायदा घेउन पॅरोलवर सुटलेल्या कैद्यांकडून चोरी, चेन स्नॅचिंग, खुनी हल्ले केले जात असल्याचेही पोलिसांना दिसून आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या