सहा लाखांचे दागिने पळवणाऱ्या नोकरांना अटक

झटपट श्रीमंत होण्यासाठी नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी पॉलिशसाठी आलेले सहा लाखांचे हिऱ्याचे दागिने चोरून पळालेल्या दोन नोकरांना दहिसर पोलिसांनी अटक केली. महादेव कायल आणि विश्वजीत बेरा अशी त्या दोघांची नावे असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

तक्रारदार हे व्यावसायिक असून त्याचा सोन्याचे दागिने पॉलिश करण्याचा कारखाना आहे. त्या कारखान्यात चार कामगार काम करतात. गेल्या आठवडय़ात महादेव आणि विश्वजीत हे दोघे तक्रारदाराकडे नोकरीसाठी आले. दागिने पॉलिश करण्याचा अनुभव असल्याने तक्रारदारांनी त्या दोघांना कामावर ठेवले. कामावर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दोघांना काही सोन्याचे दागिने आणि हिरे पॉलिश करण्यासाठी दिले होते. दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यावर जेवायला बाहेर जातो असे सांगून त्या दोघांनी सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे घेऊन पळ काढला. दुपारी जेवणासाठी गेलेले ते दोघे सायंकाळपर्यंत न आल्याने तक्रारदारांनी त्या दोघांना फोन केला. त्या दोघांचा फोन लागत नव्हता. दागिने पळवून नेल्याप्रकरणी तक्रारदारांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दहिसर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

परिमंडळ-12 चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील सहायक निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे यांच्या पथकाने तपास सुरू केला.  तपासादरम्यान ते दोघे नालासोपारा येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपास करून महादेवला नालासोपारा तर विश्वजीतला अहमदाबाद रेल्वे स्थानकातून ताब्यात घेऊन मुंबईत आणले. चौकशीत त्या दोघांनी सोन्याचे दागिने आणि हिरे चोरल्याची पोलिसांना कबुली दिली.

दोन दिवस अगोदरच बदलले भाडय़ाचे घर 

कारखान्यातून दागिने चोरण्यापूर्वी महादेवने नालासोपारा येथील भाडय़ाचे घर बदली करून दुसरीकडे घर घेतले. नवीन घरापर्यंत पोलीस येणार नाहीत असे त्याला वाटले होते. तर विश्वजीत हा नालासोपारा येथून बसने सुरतला, त्यानंतर अहमदाबाद येथून रेल्वेने तो पश्चिम बंगालला जाणार होता.

आपली प्रतिक्रिया द्या