म्हाडाच्या गतवर्षीच्या लॉटरीतील विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील विक्रांत सोसायटीतील 76 लाख रुपये किमतीची अल्प उत्पन्न गटातील घरे यंदाच्या लॉटरीत केवळ 60 लाखांत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आठच महिन्यांत घरांच्या किमती म्हाडाने तब्बल सोळा लाख रुपयांनी कमी केल्यामुळे गतवर्षीच्या लॉटरीतील विजेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर सोसायटीतील सदस्यांनी नुकतीच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली असून आमच्याही घरांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी केली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला मिळालेल्या 370 घरांचा समावेश आहे. यात विक्रोळी कन्नमवार नगर येथील विक्रांत को-ऑप. सोसायटी इमारत क्र. 91 मधील गतवर्षीच्या लॉटरीतील शिल्लक घरे देखील आहेत. ऑगस्ट 2023 मधील लॉटरीत या सोसायटीमधील 425 ते 455 चौरस फूट आकाराच्या अल्प उत्पन्न गटाच्या घरासाठी म्हाडाने 68 लाखांपासून ते 76 लाखांपर्यंत किमती आकारल्या होत्या. यंदाच्या लॉटरीत या घरांच्या किमतीत साधारण एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली.
यंदाच्या सोडतीत पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या या घरांना सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ऐनवेळी 370 घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी केल्या. 21 ऑगस्ट रोजी म्हाडाने जारी केलेल्या शुद्धिपत्रकानुसार, विक्रांत सोसायटीतील 76 लाखांचे घर आता केवळ 60 लाखांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर सोसायटीतील रहिवाशांनी नुकतीच गृहनिर्माण मंत्र्यांची भेट घेतली असून आमच्या देखील घराच्या किमतीचा फेरविचार करा, अशी मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.
एकाच योजनेतील घरांसाठी भेदभाव का?
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणे हे म्हाडाचे ध्येय आहे. गतवर्षीच्या लॉटरीत म्हाडाने घरांच्या ज्या किमती जाहीर केल्या त्यावर विश्वास ठेवून आम्ही घरे घेतली. विक्री होत नाही म्हणून यंदाच्या लॉटरीत त्याच घरांच्या किमती जवळपास 16 लाखांनी कमी करणे हा म्हाडावर विश्वास ठेवणाऱ्या आमच्यासारख्या विजेत्यांवर अन्याय आहे. आम्ही देखील कर्ज काढून घरांसाठी कशीबशी पैशांची जमवाजमव केली. मग एकाच योजनेतील घरासाठी हा भेदभाव का, असा सवाल सोसायटीमधील रहिवासी सुहास तावडे यांनी उपस्थित केला. तसेच आमच्याही घराच्या किमतीबाबत फेरविचार व्हावा अशी मागणी त्यांनी केली.