जाणून घ्या कर्नाटकचा ‘नंबर गेम’ अशी वाचू शकते येडियुरप्पांची खुर्ची

93

सामना ऑनलाईन । बंगळुरू

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकातील येडियुरप्पा सरकारला मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने येडियुराप्पांना शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्यापूर्वी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुराप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटकातील ‘नंबर गेम’ आणखी चुरशीचा बनला आहे.

काय आहे संख्याबळ?

कर्नाटक विधानसभेत २२२ आमदार आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी ११२ आमदारांची आवश्यकता असेल. भाजपचे १०४ आमदार आहेत. तर काँग्रेसचे ७८, जेडीएसचे ३८ आणि अन्य २ आमदार आहेत. जेडीएसचे एचडी कुमारस्वामी दोन मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यापैकी एका जागेचा त्यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी १११ जागांची आवश्यकता असेल.

काँग्रेस आमदार ‘नॉट रिचेबल’

बहुमत मिळवण्यासाठी होणाऱ्या घोडेबाजाराला लगाम घालण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने आपले आमदार सुरक्षित ठिकाणी ठेवलेत. या दोन्ही पक्षांचे एकत्रित संख्याबळ ११६ आहे. मात्र या आघाडीतील काँग्रेस आमदार आनंद सिंह सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. काँग्रेसने मात्र आनंद सिंह आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे.

भाजपकडे सात आमदार कसे येणार?

काँग्रेस-जेडीएसने ११६ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केलेला असताना भाजपनेही बहुमतचा दावा केलाय. विधानसभेत विश्वादर्शक ठरावाच्यावेळी काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार गैरहजर राहिले तरच भाजपला बहुमत मिळू शकते. काँग्रेस-जेडीएस आघाडीतील किमान १४ आमदार गैरहजर राहणे आवश्यक आहे. तरच बहुमताचा आकडा २०७ आमदारांच्या आधारावर निश्चित होऊ शकतो. भाजप अशी परिस्थिती कशी निर्माण करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

 लिंगायत आमदारांवर लक्ष

बहुमत सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भाजपचे लक्ष्य हे काँग्रेस आणि जेडीएसमधील नाराज आमदार आहेत. काँग्रेस सात लिंगायत आमदार गैरहजर राहण्याची शक्यता आहे. कर्नाटकात लिंगायत आणि वोक्कलिगा या जातींमध्ये जुना संघर्ष आहे. येडियुरप्पा हे लिंगायत आहेत तर काँग्रेस-जेडीएस आघाडीचे नेते कुमारस्वामी हे वोक्कलिगा आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील लिंगायत आमदारांना भाजप टार्गेट करु शकतो.

याचबरोबर दोन अपक्ष आणि एक बसपाच्या आमदारावरही भाजपची नजर असेल. बसपाचा आमदार सध्या जेडीएससोबत आहे. मात्र विश्वादर्शक ठरावाच्यापूर्वी या तिघांना आपल्या गटात खेचण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करु शकते.

आपली प्रतिक्रिया द्या