तुमचा पगार किती? आमदाराने विचारला सनदी अधिकाऱ्याला प्रश्न

मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जिल्हाधिकारी विकास मिश्रा यांच्या नावाची बरीच चर्चा सुरू आहे. आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे ते चर्चेत असतात. जिल्हाधिकारी मिश्रा यांनी नुकतंच एक शिबीर आयोजित केलं होतं. या शिबिराला हजर असलेल्या 11 वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्यांनी एक दिवसासाठी जिल्हाधिकारी बनवलं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेस आमदार ओंकार सिंह मरकाम हे देखील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिक्षा यांनी दिंडोरी जिल्ह्यातल्या करंजिया भागातील खारीडीह ग्रामपंचायतीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. लोकांच्या तक्रारीचे वेगाने निराकरण व्हावे यासाठी एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी 11वीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीला एक दिवसांसाठी जिल्हाधिकारी बनवत असल्याचे जाहीर केले होते. यावेळी मिश्रा यांनी या मुलीच्या हातात माईक देत जिल्हाधिकारी या नात्याने गावकऱ्यांना संबोधित करण्यास सांगितले होते. यावेळी आमदार ओंकारसिंह मरकामही उपस्थित होते. यावेळी आमदारांनी एकदा सोडून दोनवेळा जिल्हाधिकारी मिश्रा यांना त्यांचा पगार विचारला.

जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून आमदार मरकाम यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला साधारणपणे 1 लाख रुपये पगार असेल ? यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की जास्त आहे. त्यावर आमदारांनी विचारले की किती आहे. याचे उत्तर देण्यास नकार देताना जिल्हाधिकारी म्हणाले की महिलेला तिचे वय आणि पुरुषाला त्याचा पगार विचारायचा नसतो. यावर आमदार म्हणाले की असं धरून चालू की तुम्हाला 1 लाख 80 हजार रुपये महिना पगार आहे. या हिशोबाने दिवसाला 6 हजार रुपये होतात. यामुळे मी जिल्हाधिकारी झालेल्या मुलीला आजच्या दिवसाचा 6 हजार रुपये पगार देत आहे.