बोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का? झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल

61

सामना प्रतिनिधी ।  हरारे

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाच्या कामकाजात देशाच्या सरकारने हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) झिम्बाब्वे संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निलंबित केले. या निर्णयाचा झिम्बाब्वेच्या खेळाडूंना मोठा फटका बसणार असल्याने झिम्बाब्वेच्या अनेक स्टार क्रिकेटपटूंनी बोर्डाच्या बेफिकिरीचा आणि चुकीचा फटका आम्हाला का? असा सवाल आयसीसीला विचारला आहे.

आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या घटनेतील नियमांचा भंग करीत झिम्बाब्वेच्या सरकारने देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवला आणि झिम्बाब्वे संघालाच निलंबित केले. त्यामुळे कधी काळी टीम इंडियासारख्या बलाढय़ संघाला पराभूत करण्याची किमया साधणाऱया झिम्बाब्वे संघाच्या क्रिकेटपटूंचे करीअरच धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वे संघ जानेवारी 2020 मध्ये तीन टी-20 लढतीच्या दौऱयासाठी हिंदुस्थानात येणार होता. यापूर्वी झिम्बाब्वे संघाने फेब्रुवारी आणि मार्च 2002 मध्ये शेवटचा हिंदुस्थान दौरा केला होता.

आयसीसीच्या निर्णयाने आमच्या कारकीर्दीवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. कारण क्रिकेट हेच आम्ही आमच्या चरितार्थाचे साधन बनवले आहे. बोर्डाच्या अथवा सरकारच्या चुकीची शिक्षा आयसीसी आम्हाला का देतेय?  – सिकंदर रझा, झिम्बाब्वेचा अष्टपैलू क्रिकेटर

आयसीसीचा झिम्बाब्वे संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्याचा निर्णय आमच्या काळजावर घाला घालणाराच आहे. कारण या देशातील हजारो कुटुंबांची गुजराण या खेळावर होते. एका निर्णयाने आमचे क्रिकेटर, प्रशिक्षक, ग्राऊंड्समन, सपोर्ट स्टाफचे सदस्य बेरोजगार झाले आहेत.  –  ब्रेंडन टेलर, झिम्बाब्वेचा माजी कर्णधार

आयसीसीने झिम्बाब्वे संघाला निलंबित केलंय, आता सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे उरलेला नाही. मी माझ्या निवृत्तीचा निरोप माझ्या सर्व मित्रांना इंस्टाग्रामवरून पाठवणार आहे. –  सॉलोमन मायर, झिम्बाब्वेचा अष्टपैलू क्रिकेटर

आपली प्रतिक्रिया द्या