स्पर्धा परीक्षा जिंकण्यासाठी…

1001

हे स्पर्धेचे जग आहे. माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, संगणकाचे युग आहे. हे आपण सतत ऐकतो, वाचतो आहोत. आयुष्य हीच जणू स्पर्धा आहे हे जवळजवळ बरेचजण अनुभव घेत आहेत. स्पर्धा जिंकण्यासाठी बरेच चांगले गुण असायला हवेत, आत्मसात करायला हवेत. चिकाटी, जिद्द, एकाग्रता, सातत्य, मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम हे गुण असायलाच हवेत. या शतकातच काय, हे गुण सर्वच शतकांत उपयोगी असणारे आहेत. या गुणांनी कोणतीही सामान्य व्यक्ती आपल्या जीवनाचं सोनं बनविते. ऐन उमेदीतील काळ म्हणजे सुवर्णकाळच आहे. हा काळ काही केल्या पुन्हा परत येणार नाही. म्हणूनच या वयात आपल्या आयुष्याचे सोने करायला हवे. हा काळ म्हणजे जीवनध्येय निश्चितीचा काळ म्हणून याकडे पाहायला हवे. या आणि या वयात ज्याला या गोष्टी समजतात व त्याप्रमाणे जो कृती करून वाटचाल करतो तोच ही आयुष्याची स्पर्धा जिंकतो.

जसा दिवस लगेच संपतो, वर्ष सरते तसेच आयुष्यातील सुवर्णकाळ कधी संपला हे कळतदेखील नाही. जे या सुवर्णकाळात भरीव काम करतात त्यांना याची खंत उरत नाही ते आणखी जोमाने, नव्या उमेदीने सतत कार्य करीत राहतात आणि अजरामर होतात. म्हणून स्पर्धा जिंकण्यासाठी चांगल्या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच दूरदृष्टी असणेही महत्त्वाचे आहे.
जॉन मोर्ले यांच्या मते जीवनात अपयश का मिळते याचे सर्वसामान्य प्रवाहपतीत होण्यात आहे. केवळ एखादी संधी हुकली किंवा एखादी चूक केली म्हणून अपयश येत नाही, पण अनेक स्वरूपात येणाऱया व आवाक्यात असलेल्या सर्व संधी सोडून देणे आणि आपले सामर्थ्य उधळेपणाने वाया घालवणे यामुळे अपयश येते. स्पर्धा परीक्षांद्वारे उमेदवार आपले जीवनमान उंचावू शकतो, परंतु फक्त बऱ्याच जणांमध्ये याबद्दल बरेचसे गैरसमज असतात आणि त्यामुळे बऱयाच शंका निर्माण झालेल्या असतात तसेच त्या शंकांचे निरसन योग्यवेळी झाले नाही तर आयुष्याला नवी दिशा कदाचित मिळतच नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱया उमेदवारांमध्ये संयम, सहनशीलता असणे फार महत्त्वाचे आहे. कधी कधी संपूर्ण भरती प्रक्रियेला वेळ लागतो अशा वेळेस संयम व सहनशील वृत्तीच सावरू शकते. अन्यथा नकारात्मक विचारसरणी उमेदवारांमध्ये वाढीस येऊ शकते. अभ्यासाचे सूत्रबद्ध नियोजन केल्याशिवाय आपणास आपणाजवळ असलेल्या वेळेचा व्यवस्थितपणे व पुरेपूर वापर करता येत नाही. सहनशीलता गुण उमेदवारांमध्ये असेल तर तो एखादे अपयश पचवून पुन्हा नव्याने तयारी करू शकतो.

यशस्वी होण्यासाठी व्यवस्थितरीत्या व तंत्रपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. बहुतेक वेळा मुलांना या परीक्षेसाठीच्या अभ्यासाची योग्य दिशा उशिरा सापडते. जिद्द व आत्मविश्वास तसेच हरवलेले मोजके विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी होतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना उमेदवाराला सर्व बाबींची, सर्व क्षेत्रांची माहिती करून घ्यावी लागते, पण त्याचबरोबर एखाद्या क्षेत्रातील ज्ञानाचा वापर दुसऱया क्षेत्रात करण्यासाठीची कला त्यास येत असल्यास तो स्वतःची तयारी इतरांपेक्षा जलद आणि कार्यक्षमतेने करू शकतो. प्रत्येक यशस्वी माणसाचे यश हे अपयशाच्या अनेक पायऱयांवर उभे असते. अडचणी, संकट, अपयश यांच्याशी सामना करण्यातच खरा पराक्रम असतो. त्यांच्याशी लढण्याने आपली कसोटी लागते. (म्हणतातच ना सोन्याला अग्निपरीक्षा द्यावी लागते.) आणि म्हणूनच संकटे, अडचणी यामुळे माणसाने घाबरून न जाता त्यावर स्वार झाले पाहिजे. संकटांचे रूपांतर संधीत करणाराच स्पर्धा जिंकतो हे लक्षात ठेवा. जर तुम्ही संकटांना घाबरलात, त्याचा बाऊ केलात तर संकटे तुमच्यावर स्वार होतील आणि तुम्हाला नाउमेद करून सोडतील.

लोकल ते ग्लोबल हा घडणारा बदल समजून घ्यायला हवा म्हणजेच दूरदृष्टी ठेवायला हवी. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱयास प्रामाणिकपणा व नम्रतेच्या सहाय्याने आवश्यक ते ज्ञान मिळविता येते. यश मिळविण्यासाठी अभ्यास, सातत्य व जिद्द, मेहनत यांच्याइतकेच प्रामाणिकपणा व नम्रतेला महत्त्व आहे. नम्रता हा मानवी जीवनाचा स्थायिभाव समजला जातो. यशस्वी माणसाचे ते सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य समजले जाते. म्हणूनच म्हणतात ना, विद्या विनयेन शोभते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी हे समजोन्नतीसाठी मोलाचे योगदान करू शकतात. लक्षात घ्या या वर्षभरात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत त्याचा लाभ उठवा आणि जीवनाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी अभ्यासाची कास धरा. कित्येक विद्यार्थ्यांना वय निघून गेल्यानंतर या स्पर्धा परीक्षेचे महत्त्व लक्षात येते. त्यानंतर पश्चात्तापाशिवाय काहीच उरत नाही. म्हणून मिळणाऱया संधीचा पुरेपूर फायदा कोणत्याही परिस्थितीत घेतलाच पाहिजे.

प्रा. संजय मोरे

आपली प्रतिक्रिया द्या