उन्हाची तप्तता, त्वचेची काहिली…कसे जपायचे स्वत:चे सौंदर्य?

डॉ. अप्रतिम गोएल, सौंदर्यतज्ञ

उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्वचा काळवंडणे, घामोळं येणे, खाज सुटणे अशा त्वचेच्या अनेक तक्रारींना सुरुवात होण्याआधीच या कडक उन्हाचे त्वचेपासून रक्षण करण्याची काळजी घ्यायला हवी. ज्या स्त्र्ायांची फिरतीची नोकरी आहे अशांनी याबाबत जास्त जागरुक राहायला हवं, कारण उन्हातान्हातून कामासाठी सतत फिरल्यामुळे सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा येते. त्यामुळे तिच्यावरचं मॉइश्चर कमी होतं. चेहरा, मान, पाठ, हात आणि पाय तीव्र सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्याने तिथली त्वचा काळवंडल्याचं आढळून येतं. चप्पल घातल्यानंतर पायाची त्वचा जास्त काळवंडते. अशावेळी फक्त एसपीएफ पुरेसं नाही. तर त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवण्यासाठी ‘डय़ुअल स्पेक्ट्रम किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम सन प्रोटेक्शन’ लोशनचा वापर करा.

आपापल्या त्वचेच्या गरजेप्रमाणे आणि कंडिशनप्रमाणे यात बदल करणं आवश्यक असतं. त्यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा बाहेरून तजेलदार दिसते. चेहऱ्याला अंगाला, आणि हातापायांना लावण्यासाठी वेगळं मॉइश्चरायझर निवडावं.

उन्हाळ्यातील त्वचाविकार आणि त्यावरील उपाय

> त्वचेची जळजळ आणि काळवंडणे
२५ एसपीएफ असलेले सनक्रिन आणि कॅलामाईन लोशन लावूनच घराबाहेर पडा. गॉगल, छत्री, टोपी, स्कार्फ, सनकोटचा वापर करा. अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या, तुळशीची पाने घाला. यामुळे शरीराला सुगंध येण्याबरोबरच मृत पेशीही कमी होतील.

> घामोळ्या
थंड पाण्याने अंघोळ करा. सैल कपडे घाला. अंघोळीनंतर टॅल्कम पावडर लावा. आहारात फळांचा समावेश करा. एक कप दुधात अर्धा चमचा ग्लिसरीन आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण घामोळ्यांवर अर्धा तास लावा. त्यानंतर धुवा.

> फंगल इन्फेक्शन
शरीरावर बुरशीप्रमाणे पांढरा थर साचतो. अशा वेळी तज्ञांचा सल्ला घ्याच. शिवाय अँण्टी फंगल डस्टिंग पावडर वापरा. रात्री झोपताना अँण्टी फंगल डस्टिंग क्रिमही वापरा.

त्वचेची काळजी
> सन प्रोटेक्शन लोशन फक्त चेहऱयाला लावण्याऐवजी मान, पाठ, दंड, हाताच्या पाठचा भाग, पाय यावरही ते लावा.
> घराबाहेर जाण्यापूर्वी  १५-२० मिनिटे आधी त्वचेवर सनक्रीन लावले गेलं तर उपयुक्त ठरतं.
> रोज पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याबरोबरच कलिंगड, टोमॅटो, गाजर, काकडी असे पाण्याचा अंश असलेले पदार्थ खा.
> मेडिटेशन आणि दीर्घ श्वसनामुळे मन शांत होतं. रक्ताभिसरण चांगलं होतं. त्वचेवर तेज येतं.
> मेक-अप केल्यानंतर किंवा एखाद्या कार्यक्रमाहून परतल्यावर क्लिन्झर लावून मेक-अप काढून त्वचा स्वच्छ धुवून मग साधे मॉईश्चरायझर लावा.
> दिवसातून किमान चार वेळा थंड पाण्याने अलगदपणे चेहरा-मानेच्या त्वचेवर हबकारे मारल्याने त्वचा टवटवीत होते. त्यानंतर मऊ कापडाने किंवा टॉवेलने हलकेच पुसून घ्या.

आहार…
उन्हाळ्यात जंक फूड, मसालेदार पदार्थ, मद्यपान टाळावे. मांसाहार अगदी माफक प्रमाणात करावा. आहारात पेज, द्रवपदार्थ, पाणीदार फळे, दुधी, पालक, कोबी, टॉमेटो यांचे सेवन करावे. कोल्ड्रींकऐवजी ताक, पन्हे, लिंबूपाणी, कोकम सरबत, आवळा सरबत प्यावीत. पचनयंत्रणा मंद होत असल्याने जडान्न, अतीगोड पदार्थ, मिठाया, मटनासारखे जड अन्न यांच अतिरेक टाळावा.