अशी वाढवा स्मरणशक्ती

438

सामना ऑनलाईन । मुंबई

काहीजणांना काही दिवसांपूर्वीचं आठवत नाही. त्यांचा तो विसरभोळेपणा विनोदाला कारण ठरतो. पण बऱयाचदा या साध्या विसराळूपणापासून अल्झायमरसारखे मोठे विकारही होऊ शकतो. आठवणं किंवा विसरणं या दोन्ही क्रिया आपल्या मेंदूद्वारे घडतात. कारण मेंदू प्रथम एखाद्या विषयाचे ग्रहण करतो. मग त्याविषयीचे ज्ञान तो संरक्षित ठेवतो… आणि त्यानंतर योग्य त्या वेळी त्या माहितीचे स्मरण करून देतो. या तीन टप्प्यांत मेंदूचे कार्य चालते.

योग्य प्रकारचा आहार आणि शांत जीवनशैली असेल तर स्मरणशक्ती चांगली राहू शकते. योग्य आहार म्हणजे तो पोषक असायला हवा. गायीचे दूध, तूप, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा आपल्या आहारात नियमित समावेश असला पाहिजे. आहाराविषयी आयुर्वेदात म्हटलंय की उत्तम स्मरणशक्तीसाठी गाईचे दूध, साळीच्या लाह्या, बदाम, अक्रोड, कोहळा हे खाद्यपदार्थ ‘मेध्य’ म्हणजेच बुद्धी वाढवणारे आहेत. विशेष म्हणजे शिळे पदार्थ, गकार, तोंडली, दही, म्हशीचे दूध हे पदार्थ बुद्धीमांद्यकर असल्याने ते जास्त खाण्याचे टाळावेत. कारण आहारात ते जास्त असतील तर स्मरणशक्ती कमी होऊ शकते. मैद्याचे किंवा बेकरीचे पदार्थ, आंबकलेले पदार्थ, चायनीज, पचायला जड पदार्थ खाऊ नयेत. कांदा, लसूण, म्हशीचे दूध ‘तम’ वाढवणारे असतात. त्यामुळे शक्यतो ते टाळा. चहा आणि कॉफी या उत्तेजक द्रव्यांचे अतिसेवनही टाळणे स्मरणशक्तीसाठी गरजेचे ठरते.

आता स्मरणशक्ती कमी झालीच, विसरभोळेपणा वाढलाच तरी घाबरण्याचे कारण नाही. काही सोप्या उपायांद्वारे स्मरणशक्ती वाढवता येते. सर्वात प्रथम म्हणजे नियमित व्यायाम स्मरणशक्तीसाठी खूप गरजेचा आहे. चालणे, पळणे, सूर्यनमस्कार अशा व्यायामामुळे मेंदूला चांगला रक्तपुरकठा होतो आणि त्यामुळे स्मरणशक्तीही वाढते. अनुलोम, किलोम, प्राणायाम, भ्रामरी, ॐ कार जप यामुळे मनाची एकाग्रता वाढून स्मरणशक्तीही मजबूत होते. ६ ते ८ तासांची झोप उत्तम स्मरणशक्तीसाठी आवश्यक असते. डोके व तळपायाला रोज तेलाने मालिश केल्यास गाढ झोप लागून मेंदूला आराम मिळतो. स्मरणशक्ती तल्लख होते. झोपण्यापूर्वी बराचवेळ टीव्ही पाहात राहिले तर नंतरची झोप गाढ नसते. त्यामुळे स्मरणशक्तीवर ताण पडून ती कमजोर होते. आयुर्वेदात उत्तम बुद्धी व स्मरणशक्तीसाठी अनेक औषधींचे वर्णन केलेले आढळते. विशेषतः ब्राह्मी, शंखपुष्पी, ज्येष्ठमध ही औषधे तल्लख बुद्धीसाठी अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने या औषधांच्या कापराने स्मरणशक्ती वाढवता येऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या