अशा ओळखा सरकारी नोकरीच्या फसव्या जाहिराती

76

सामना ऑनलाईन । मुंबई

सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचच एक स्वप्न असतं. त्यामुळेच अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. मात्र सध्या सरकारी नोकरी मिळवणं हे काही सोपं काम राहिलेलं नाही. याच संधीचा फायदा घेत काही जण बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना सरकारी नोकऱ्यांचं आमिष दाखवतात. मात्र प्रत्यक्षात असं काहीच नसतं.

नोकरीसाठी प्रयत्न करत असलेले कित्येकजण या फसव्या जाहिरातींना बळी पडतात. यामुळे आर्थिक नुकसान किंवा मग पश्चाताप होण्याची दाट शक्यता असते. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीसाठीच्या जाहिराती पाहत असाल तर ती जाहिरात खरी आहे की खोटी हे ओळखण्यासाठी या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

– सरकारी नोकऱ्यांसाठी साधारण वयोमर्यादा ही ३० ते ४० वर्षे इतकी असते. मात्र फसव्या जाहिरातीमध्ये ही वयोमर्यादा वाढवून ५५ ते ६० वर्षे इतकी असते.

– फसव्या जाहिरातीमध्ये भरतीसाठीच्या पदांची संख्या ही वाढवून ५,००० ते १०,००० दाखवली जाते. जास्तीत जास्त लोक या फसव्या जाहिरातीच्या जाळ्यात अडकावेत म्हणून ही पदांची संख्य़ा वाढवलेली असते.

– फसव्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता ही कमी असते. म्हणजेच ८वी पास, १०वी पास उमेदवारांसाठी संधी असल्याचं दाखवलं जातं.

– जाहिरातीमध्ये ज्या विभागातील रिक्त पदांचा उल्लेख केला असेल. त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ही माहिती खरी आहे का हे तपासा.

– सरकारी विभागांच्या संकेतस्थळाच्या शेवटी .nic.in किंवा .gov.in असतं. मात्र फसव्या जाहिरातीमध्ये अशा कुठल्याच गोष्टीचा उल्लेख नसतो.

आपली प्रतिक्रिया द्या