मंगळवावर कसे राहाल?

मंगळाच्या निमित्ताने पाहूया अंतराळातील वास्तव्य कसे असते ते…

चला, आपण मंगळ प्रवासाला निघूया! पण त्यासाठी आपणांस अगोदरपासून खूप तयारी करावी लागणार आहे. प्रथम सहा महिने अगोदर आपण शून्य गुरुत्वाकर्षणाच्या सरावासाठी नासा किंवा इस्रोच्या अवकाशवीर प्रशिक्षण शिबिरात दाखल होऊया. मुंबईहून विमानाने अमेरिकातील नेवार्क येथे डायरेक्ट जाणाऱया विमानाला १६ तास लागतात. आपल्याला स्पेस शटलमधून मंगळ ग्रहापर्यंत जायला ३०० दिवस लागणार आहेत. शून्य गुरुत्वाकर्षणामधून आपणांस प्रवास करावा लागणार आहे. अर्थात त्यासाठी आपणांस खूप सराव करायला हवा.

मंगळ प्रवासासाठी मुहूर्त काढावयास हवा. हा मुहूर्त काढताना आपणांस आपले पंचांग मदत करू शकणार नाही. त्यासाठी खगोलीय पंचांगाचा आधार घ्यावयास लागणार आहे.

1) दि. ३१ जुलै २०१८ – ५ कोटी ७५ लक्ष ९० हजार कि.मी.

2) दि. ६ ऑक्टोबर २०२० – ६ कोटी २० लक्ष ७० हजार कि.मी.

3) दि. १ डिसेंबर २०२२ -८ कोटी १४ लक्ष ५० हजार कि.मी.

4) दि. १२ जानेवारी २०२५ – ९ कोटी ६० लक्ष ८० हजार कि.मी.

5) दि. २० फेब्रुवारी २०२७ – १० कोटी १४ लक्ष २० हजार कि.मी.

आपल्या सोयीने आपण तारीख ठरवूया. या सर्व तारखांसाठी स्पेस शटल तयार आहे. मात्र लक्षात ठेवा. हे दिवस पृथ्वीवरून निघण्याचे नाहीत. मंगळ ग्रह या दिवशी पृथ्वीच्या जवळ येणार आहे. आपण या दिवशी मंगळावर पोहोचूया.

मंगळावर जाण्यासाठी ३०० दिवस जायला व तेवढेच दिवस परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. आपण खास विमाही काढलेला आहे. तसेच आप्तेष्ट, मित्रांची परवानगीही घेतलेली आहे. आपण स्पेस शटल उड्डाणाच्या ठिकाणी आलो आहोत. आपली नातेवाईक मंडळी आपल्याला निरोप द्यायला आली आहेत. डॉक्टरांच्या टीमने आपल्या सर्वांच्या आरोग्याची तपासणीही केली आहे. सर्व काही  ‘ओके’ आहे. आपण सर्वांचा निरोप घेत आहोत. आपल्या घरच्यांचे चेहरे तर चिंताग्रस्त दिसत आहेतच, परंतु मंगळ प्रवासासाठी ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे, त्यांचे चेहरे तर जास्त चिंताग्रस्त दिसत आहेत. आपल्या ऑफिसमधला आपल्या हाताखालचा कारकून जरा जास्त खुषीत दिसतोय. तो जास्त खूष का झालाय ते त्याचे त्यालाच ठाऊक! चला, स्पेस शटलमध्ये बसल्यावर त्याचे दरवाजे बंद झालेत. वर जाण्याची वेळ झाली. उलटे आकडे मोजायला सुरुवात झाली. फाय.. फोर… थ्री … टी….. वन …झीरो …! मंगळ ग्रहावर जाण्यासाठी आपले स्पेस शटल आपल्याला घेऊन निघाले. वर जाताना पृथ्वी सुंदर दिसत आहे. पृथ्वी सोडताना आपल्या मनात थोडी खंतही आहे. जलप्रदूषण, वायुप्रदूषण करून आपणच आपल्या वसुंधरेला कुरूप करीत होतो याची! आता पृथ्वीला खूप जपले पाहिजे याची जाणीव होतेय! आता खूप अंतर पार केले. स्पेस शटलमधील एका यंत्रावर पृथ्वीपासूनचे वाढत जाणाऱया अंतराचे व दुसऱया यंत्रावर मंगळ ग्रहापासूनचे कमी कमी होत जाणाऱया अंतराचे आकडे दिसत आहेत.

अंतराळवीराचा पोशाख, सभोवतालची यंत्रे, बाहेर काळाकुट्ट अंधार आणि शून्य गुरुत्वाकर्षणामधील आपला प्रवास यांचा आता चांगला सराव झाला आहे. पृथ्वीवरच्या सर्व बातम्या आपणांस मॉनिटरवर दिसत आहेत. रात्री झोपताना बेल्ट लावून झोपायचे, स्पंजने अंग पुसून स्नान करावयाचे! पाण्याचे तरंगते थेंब तोंडात झेलून पाणी प्यायचे, दात साफ करायची पेस्ट तर वेगळीच होती. गिळली तरी चालणारी! सर्व गोष्टींची सवय झाली होती.सोबत आणलेले खाद्यपदार्थ खाताना खूप गंमत यायची. स्पेस शटलमध्येच व्यायाम करायची यंत्रे होती. साऱया गोष्टींची सवय आपणांस चांगली झाली. पाच मिनिटांचा स्पेसवॉकचा तर थरारक अनुभव! प्रथम स्पेशल स्पेससूट घालायचे! स्पेस शटलला दोन दरवाजे असलेल्या ठिकाणी जायचे. मग पहिला दरवाजा उघडणार, नंतर पहिला दरवाजा बंद होऊन दुसरा दरवाजा उघडणार! स्पेससूटला आणि स्पेस शटलला एक नळी जोडलेली आहेच. पाच मिनिटांचा स्पेसवॉक! खरोखर चित्तथरारक अनुभव! अथांग अंतराळ! अमर्याद अवकाश! सर्व काही स्वप्नवत होते.अवकाशातील तेजोगोल दिसत होते. इथे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा दिशा या नव्हत्याच!

बाहेरून स्पेस शटल पाहिले. पाच मिनिटे क्षणार्धात संपली! स्पेसवॉक संपवून स्पेस शटलमध्ये आलो. दिवस जात होते. पृथ्वीपासूनचे अंतर वाढत होते. मंगळ आमच्या जवळ येत होता,
स्पेस शटलमधून आम्ही मार्स लॅंडरमध्ये आलो. काही जण ऑरबिटरमधून मंगळाभोवती प्रदक्षिणा घालणार होते. मार्स लॅंडर स्पेस शटलपासून अलग झाले. अलगदपणे ते मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले. मंगळावर रोव्हर फिरू लागला. मंगळाचा पृष्ठभाग तांबूस रंगाचा दिसत होता. पृष्ठभागावर दूरवर पर्वत दिसत होते. मंगळावर संशोधन करण्यासाठी काही उपकरणे ठेवण्यात आली. मातीची नमुने घेण्यात आले. मंगळावरचा मुक्काम संपला होता. पुन्हा मंगळाच्या अवकाशात उड्डाण करून स्पेस शटल गाठले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. केव्हा एकदा आपल्या पृथ्वीवर पाऊल ठेवतो असे सर्वांनाच झाले होते.