‘गणिता’चे कोडे सोडविणे कठीण

545
प्रातिनिधीक फोटो

<<मेघा गवंडे-किटे>>

दहावीला गणित विषयाला पर्यायी विषय द्यायचा की नाही हे कोडे सोडविणे फार कठीण आहे. शिक्षकांच्या मते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनी गणित विषय अभ्यासायला हवा. हा विषय गाळून चालणार नाही. अकरावीनंतर पुढे या विषयाला खूप पर्याय उपलब्ध आहेत. पण बीजगणित, भूमितीमुळे दरवर्षी दहावीच्या परीक्षेची वारी करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर दहावीनंतर आर्टस् आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळणाऱया आणि गणिताची भीती वाटणाऱया विद्यार्थ्यांसाठी हा विषय ऑप्शनल हवा, असे मत नोंदविणारा प्रवाहही शिक्षण क्षेत्रात आहे.

दहावीत गणितामुळे वारंवार नापास होणाऱया विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. पुढे असे विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून देतात. त्यामुळे गणित विषय ऐच्छिक करण्याची मागणी मानसोपचारतज्ञ डॉ.हरीश शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्राची दखल घेत न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून या प्रकरणाची सुनावणी सुरू केली आहे. दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना आर्टस् किंवा इतर व्यावसायिक कोर्सेंसना प्रवेश घ्यायचा आहे. त्यांना गणिताचा काय उपयोग…? हा विषय ऐच्छिक होईल का…? अशी विचारणा न्यायालयाने शिक्षण मंडळाकडे केली असून याविषयी तज्ञांची मते विचारात घेण्याची सूचनाही केली आहे. एसएससीसह इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये शिकणाऱया ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात काही अडथळे (learning disabilities) येतात. अशा विद्यार्थ्यांसाठी गणिताला पर्याय सुचविण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

गणित अध्यापक मंडळाच्या मते…

आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना बेसिक गणित आहे. पण नववी, दहावीला गणिताची काठिण्यपातळी जास्त आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी बऱयाच संधी असतात. २० गुणांची तोंडी परीक्षा, ८० गुणांचा लेखी पेपर याशिवाय गणिताच्या प्रत्येक पायरीला गुण यामुळे गणितात पास होणे कठीण राहिलेले नाही. गणिताला पर्याय सुचवायचा की नाही हा निर्णय सर्वस्वी शिक्षण मंडळाचा आहे, मात्र गणिताचे शिक्षक पर्यायी विषयाची मागणी मान्य करणार नाही.

केंद्रीय बोर्डातील गणिताची स्थिती

आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी नववी, दहावीला गणिताऐवजी अन्य विषय घेऊ शकतात. सीबीएसई बोर्डात मात्र दहावीला गणित सक्तीचे आहे. पण विद्यार्थी अतिरिक्त व्होकेशनल विषय निवडू शकतात. पुढे निकालात या व्होकेशनल विषयाचे गुण गणितापेक्षा जास्त असल्यास विद्यार्थी एकूण निकालाच व्होकेशनलचे गुण ग्राह्य धरू शकतात.

विद्यार्थ्याला कठीण वाटणाऱ्या विषयाला पर्याय द्या!

केवळ गणित विषयाला पर्याय न देता विद्यार्थ्यांना जो विषय कठीण वाटत असेल त्या विषयाला पर्याय निवडण्याची सोय असावी. त्यामुळे विद्यार्थ्याला पदवीपर्यंतचे शिक्षण घेणे सोपे होईल, असे महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष प.म.राऊत यांनी सांगितले. अकरावीची शालान्त परीक्षा असताना सात विषयांपैकी सहा विषयांत पास होणाऱया विद्यार्थ्यांना पास केले जायचे त्यात गणित विषयाचाही समावेश असायचा. सध्या दहावीत बेस्ट फाइव्हप्रमाणे जास्तीत जास्त गुण मिळालेल्या पाच विषय ग्राह्य धरले जातात. याचाच अर्थ कमी गुण मिळणाऱया विषयाचे गुण विचारात घेतले जात नाही, असे राऊत यांनी अधोरेखित केले.

तर दहावीचा निकाल फुगेल

गणिताला पर्याय दिला तर दहावीच्या निकालात फुगवटा दिसेल. शिवाय निकालाची हवाच काढून घेतल्यासारखी होईल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण जरी वाढणार असले तरी गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होईल असे वाटते. गणिताला पर्यायी विषय सुचविण्यापेक्षा काहीतरी वेगळा मार्ग काढणे गरजेचे आहे असं गणित अध्यापक मंडळाचे सहसचिव पी. के. बोंडे यांनी सांगितले.

दहावीत गणित विषय घेणारे विद्यार्थी

  • वर्ष          गणित              सामान्य गणित
  • २०१३        १५,६९,९८५         १,३७,७८४
  • २०१४        १४,२९,००७          १,१७,०४७
  • २०१५        १५,८४,२३२         १,१४,९२९
  • २०१६        १५,९९,२३२         ९९,२६७
  • २०१७        १६,४३,८५१          ९०,७९६

 

  • २००८ पासून एसएससी बोर्डात नववी, दहावीसाठी गणित या विषयाला सामान्य गणिताचा पर्याय होता.
  • हा विषय घेणाऱया विद्यार्थ्यांना अकरावीला सायन्स शाखेत किंवा इंजिनीयरिंग, आर्किटेक्ट, पॉलिटेक्निकला प्रवेश मिळत नव्हता.
  • २०१६ मध्ये शालेय शिक्षण विभागाने नववीच्या अभ्यासक्रमात बदल करताना सामान्य गणित हा विषयही रद्द केला.
  • गेल्या काही वर्षांत सामान्य गणित घेऊन दहावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे.
आपली प्रतिक्रिया द्या