हिंदूंची धर्मांतरे कशी थांबविता येतील?

78

>>आनंदराव का. खराडे<<

हिंदूंची धर्मांतरे होण्याचे प्रकार वाढले असून अशा बातम्या वृत्तपत्रांतून वाचायला मिळतात. स्वधर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाणे, वशीकरणाच्या जाळ्यात अडकणे यात सक्ती होत असावी असा हिंदू संघटनांचा संशय असून खरी कारणे वेगळी आहेत. पिंजऱ्यात वाघ अडकावा म्हणून पिंजऱ्यात बकरी अथवा मांस ठेवले जाते. प्रलोभने, मदतीचे गाजर वंचितांसमोर ठेवले तर तो पोटाची खळगी भरण्यासाठी, फाटकी चिरगुटे बदलण्यासाठी मदतगाराचा हात धरू लागला तर दोष कुणाचा? स्वधर्म वाढविण्यासाठी, धर्माची ओढ लावण्यासाठी काही धर्मप्रचारक वस्त्यांवस्त्यांत जाऊन स्वधर्माचा प्रचार करताहेत. त्यासाठी गरीब, मजबुरांचा शोध घेतला जातोय. हिंदू धर्मातील प्रचारक हे कधी करणार? इतर धर्मप्रचारक स्वतःला प्रचारकार्यात वाहून घेतात. ते हे काम म्हणजे आपले कर्तव्य समजतात. हिंदूंचे साधू-संत आणि मंदिरातले पुजारी हेच काम का करीत नाहीत? टाळ कुटून भजने, प्रवचने, कीर्तन, होमहवन, कुंभमेळे, रथयात्रा, सत्यनारायणाच्या महापूजा आदी करतात. राम मंदिर बांधून मथुरा, काशी मिळविण्याची हेच लोक भाषा करतात. अनेकजण वारीरूपाने नाचत भगवा ध्वज खांद्यावर घेऊन दिंडय़ांतून पंढरीच्या पांडुरंगाला विनवितात. भाविक उदार अंतःकरणाने जत्रा-यात्रा करून दानपेटय़ांतून भक्तदान भरभरून टाकतात. देवाच्या दानपेटय़ांत करोडो रुपये आणि सोने, चांदी, हिरे यांचे दान देतात. धर्मप्रचारासाठी, धर्मातील गरीब-वंचितांना सावरण्यासाठी कोण व कधी धावणार?

या देशात सध्या हिंदू गरीब कुटुंबे भरपूर आहेत. कुपोषण, उपासमारीमुळे मरणाऱ्यांना, गरिबीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांना, पोटासाठी मुलाबाळांना विकणाऱ्यांना सावरायला हवे आणि आवरायलाही हवे. उपासमारीला कंटाळलेल्यांना जणू त्यांच्या अस्तित्वाची भूल पडली असून जो कोणी मदत करील तो आपलासा वाटतो आहे. जातीसाठी माती खावी परंतु परधर्म स्वीकारू नये असे म्हणणे सोपे; परंतु उपाशी पोटांना लाखोलींची पर्वा नसते. कंटाळलेल्या जिवांना जात आणि धर्म दिसत नाही. परिस्थिती माणसाला गुलाम बनविते. खाटीक जनावरे कापतो आणि मच्छीमार मासे पकडतो तेव्हा तो पाप-पुण्याची पर्वा करीत नाही. त्याला विवंचना असते भुकेची. याच मजबुरीचा फायदा इतर धर्मीय उठवताहेत. सक्तीने धर्मांतरे होत असतील तर जरब बसवा. मात्र प्रलोभनांना, मदतीच्या ओघाला भुलून जर हिंदूंची धर्मांतरे होत असतील तर मात्र आत्मपरीक्षण करा. त्यासाठी हिंदू संघटनांनी पुढे येऊन विविध जातींत विखुरलेल्या हिंदूंना एकत्र आणावे. त्यांच्यातील खऱ्या गरीबांना शोधून मदतीचा हात द्या. देवांचा महिमा सांगत फिरण्यापेक्षा भरकटलेल्या हिंदूंचे मनोमिलन करा. केवळ पोटासाठीच धर्मांतर होत असेल तर ते रोखा. त्यासाठी मदतीची दारे खुली करा. देवमंदिरे असू द्या, परंतु देहमंदिरांचाही विचार करा. हिंदू धर्माचे मर्म भोळ्या हिंदूंना पटवून सांगा. धर्मरक्षणासाठी, धर्मांतरे रोखण्यासाठी परिश्रम घ्या. हिंदू धर्म वाढवा. परोपकारातून बंधुभाव जपा. हिंदूंची धर्मांतरे कशी रोखता येतील याचा विचार प्रथम करा.

आपली प्रतिक्रिया द्या