फिरायला निघताय… घर सांभाळा!

59
  • आशिष बनसोडे

परीक्षा संपल्या… सुट्ट्य़ाही लागल्यात… आता प्रत्येकाला वेध लागले ते गावी किंवा थंड हवेच्या ठिकाणी जायचे. अनेकांनी तर आपल्या बॅगाही भरल्या. हे सगळ ठीक आहे. पण आपण घर बंद करून चाललो आहोत ते लक्ष्यात आहे ना! कारण सुट्टीचे दिवस आणि बंद घरे म्हणजे चोर, दरोडेखोरांसाठी आयते कोलीत असते. अजून सट्ट्य़ा नीट लागल्याही नाहीत पण चोरांनी बंद घरे साफ करण्यास सुरुवात केली आहे. चोरांनी इमारती, बैठीचाळींमध्ये जाऊन बंद घरांची रेकी करण्यास सुरुवात केली आहे.

एप्रिल महिना सुरू झाला तसे चोर, दरोडेखोर ऑक्टिक्ह झाले आहेत. गेल्या १५ दिवसांत देवनार (८ घरे), शिवाजीनगर (२), घाटकोपर (२), ओशिवर, दहिसर, नायगाव आदी ठिकाणी बंद घरांना टार्गेट करण्यात आले आहे. याशिवाय शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडय़ा करून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. रात्री तसेच दिवसाढकळ्या संधी मिळेल तशी बंद घरे साफ केली जात आहेत. मोठ्य़ा शिताफीने चोर कडीकोयंडा उचकटून घरात घुसतात आणि क्षणात किंमती ऐवज घेऊन पसार होतात. त्यामुळे बाहेरगावी जाण्याआधी नागरिकांनी विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. आमच्या घरात चोरी होणार नाही अशा भ्रमात अनेकजण असतात. पण त्या भ्रमात न राहणे शहाणपणाचे आहे. घाटकोपरच्या पोलीस वसाहतीमध्येच चोरांनी दोन घरांना लक्ष्य केले, तर नायगांवमध्ये पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतराकर असलेल्या इमारतीमध्ये चोरी करण्यात आली. त्यामुळे सावधानता बाळगण्याशिवाय पर्याय नाही. जर वेळीच आवश्यक खबरदारी न घेतल्यास पस्तावण्याची वेळ येते. कारण बाहेरगावी सुट्टीचा आनंद लुटत असताना येथे घर साफ झालेले असते. मग माघारी परतल्यावर बंद घर उघडे बघून आणि घरातील किंमती ऐवज गायब झाल्याचे पाहून डोक्यावर हात मारण्याशिवाय काही उरत नाही. त्यामुळे घर बंद करून बाहेर जाताना पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केलेच पाहिजे.

कड्य़ा लावून लुटमार
काही चोर वेगळीच शक्कल लढवतात. रात्रीच्या अंधारात ज्या इमारतींमध्ये बंद घरे आहेत तेथे घुसतात. पकडले जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ते प्रत्येकाच्या घराच्या दरवाजांच्या कड्य़ा बाहेरून लावतात. शिवाय लाईटदेखील बंद करतात. त्यानंतर टार्गेट केलेले घर फोडून किंमती ऐवज घेऊन पसार होतात.

११ जानेवारी ते ९ एप्रिल २०१७
भरदिवसा घरफोडी १०७ दाखल ३२ डिटेक्ट
रात्रीची घरफोडी ५२६ दाखल १८६ डिटेक्ट
१ जानेवारी ते एप्रिल २०१६
भरदिवसा घरफोडी १३३ दाखल २९ डिटेक्ट
रात्रीची घरफोडी ५५० दाखल २०७ डिटेक्ट

घर बंद करून जाताना नागरिकांनी विशिष्ट काळजी ही घ्यायलाच हवी. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, किंमती ऐवज घरात ठेवण्याऐवजी बँकेत लॉकरमध्ये ठेवा. शेजाऱ्यांना आपल्या घरावर लक्ष ठेवण्यास सांगा, नोकर-वॉचमन यांची माहिती पोलिसांना द्या, इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत या आणि अशा खबरदारीच्या उपाययोजना केल्यास घरफोडी होण्यापासून सहज रोखता येऊ शकेल. शिवाय काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क करा.
अशोक दुधे, पोलीस उपायुक्त

आधी रेकी मग हातसफाई
चोरटे परिसरातील बंद घरांची आधी रेकी करतात. कुठल्या इमारतींमध्ये घरे बंद आहेत. कोणत्या इमारतींमध्ये सीसीटीव्ही, वॉचमन आहेत याचा बारकाईने अभ्यास करतात. इतके करून ते थांबत नाहीत तर बंद घरे शोधल्यानंतर कोणत्या घरात हात साफ करायचे ते ठरवतात. त्यानंतर कुठली घरे फोडायची आणि कुठली नाही हे ठरवून मग त्या घराबाहेर विशिष्ट खूण केली जाते. त्यानुसार चोऱ्या केल्या जातात. याची देखील नागरिकांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. एखाद्या घराबाहेर जर अशी विशिष्ट खून केल्याचे आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून त्याची माहिती दिली पाहिजे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या