त्वचेची काळजी कशी घ्याल?

973

>>डॉ. अप्रतीम गोयल<<

उन्हात फिरताना जर काही गोष्टींची काळजी घेतली तर त्वचेचे उन्हापासून संरक्षण तर होतेच… शिवाय आपले सौंदर्यही अबाधित राहते.

तप्त उन्हाची काहिली… बाहेर पडणंही नकोसं… पण कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही अपरिहार्य कारणासाठी बाहेर तर पडावेच लागते. अगदी एसी गाडीतून प्रवास करतानाही उन्हापासून बचाव अशक्यच असतो. या दिवसात सूर्याची अतिनील किरणे अधिकच तीक्र झालेली असतात. या किरणांचा त्वचेशी थेट संपर्क आला तर त्वचा रापणे, काळवंडणे, शुष्क होणे, लवकर सुरकुत्या पडणे असे दुष्परिणाम दूरगामी होतात.

विशेषतः सनस्क्रीन लोशन रासायनिक द्रव्यांचा वापर असलेली आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर करून तयार केली जातात. प्रत्येकाने आपल्या त्वचेकरिता कोणते सनस्क्रीन क्रीम योग्य आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावे.

उन्हाळ्यातला आहार

उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राहील आणि उष्णतेपासून आराम मिळेल अशा आहाराची निवड करावी. खरबूज, टरबूज, अननस, कलिंगड, संत्रं, मोसंबी, आंबा अशी रसदार फळे खावीत. सनबर्नपासून रक्षण होण्यासाठी टोमॅटो खावे. भरपूर पाणी प्यावे. आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये प्रोटीन, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात.

 खेळाडूंकरिता आवश्यक सनस्क्रीन

खेळाडूंना प्रखर उन्हातही खेळावे लागते. यामुळे खेळाडूंनी (UVA DeeefCe UVB) दोन्ही फॅक्टरसहित किमान ५० एसपीएफ फॅक्टर असलेले सनस्क्रीन क्रीम वापरावे. आज जेल, प्रे, लोशन, क्रीम, वाईप्स अशा वेगवेगळय़ा प्रकारांमध्ये सनस्क्रीन लोशन उपलब्ध आहे. त्वचेच्या प्रकारानुसार त्याचा वापर करावा. उदा. तेलकट त्वचेकरिता जेल वापरणे योग्य आहे. कारण ते तेलयुक्त आहे. तसेच सनस्क्रीन वाईपचा पर्याय लहान मुलांकरिता योग्य असून खेळाडूंसाठी प्रे उपयुक्त आहे.

त्वचेची काळजी कशी घ्याल?

दररोज आंघोळ केल्यानंतर आणि घराबाहेर जाताना त्वचेला सनस्क्रीन क्रीम लावा.

शक्य झाल्यास दर तीन-चार तासांनी सनस्क्रीन क्रीम लावा.

कमीतकमी एसपीएफ फॅक्टर ३० असलेले क्रीम वापरावे.

जे लोक पाण्यात काम करतात त्यांनी वॉटरप्रूफ क्रीम वापरावे.

सनस्क्रीन क्रीम किंवा लोशनवर १०० टक्के अवलंबून राहू नये. त्याबरोबरच नेहमी छत्री, स्कार्फ, गॉगल इत्यादी वस्तूंचाही वापर करावा.

ऑण्टिऑक्सिडंटच्या स्वरूपात ओरल किंवा सिस्टीमिक सनस्क्रीन हे त्वचातज्ञांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता.

सूर्यकिरणांच्या प्रभावाने त्वचा रापली (सनटॅन) असल्यास साबण किंवा फेसवॉश आणि भरपूर पाण्याने त्वचा धुवा. त्यावर लगेच मॉइश्चरायझर लावा.

मुलायम कांतीसाठी उपाय

अर्धा चमचा गुलाबपाणी, एक चमचा मधात मिसळून १५ ते २० मिनिटे चेहऱयाला लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते. हा उपाय दररोज करता येण्यासारखा आहे.

पाऊण कप गुलाबपाणी, पाव कप ग्लिसरीन, एक चमचा व्हिनेगर आणि पाव कप मध यांचे एकत्रित मिश्रण एका बाटलीत भरून ठेवा. हे मिश्रण दररोज क्लिझिंग म्हणून वापरता येते.

केळं कुस्करून त्यामध्ये एक चमचा काकडी आणि गाजराचा रस घालून चेहरा व मानेला मसाज करावा. २० मिनिटांनी चेहरा धुवावा. आठवडय़ातून एकदा त्वचाशुद्धीकरिता हा मास्क वापरू शकता.

संवेदनशील त्वचेकरिता

ज्यांची त्वचा संवेदनशील असते त्यांनी आपल्या त्वचेबाबत, तिच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. उन्हाळय़ात फक्त सनस्क्रीन लोशन किंवा क्रीमवर अवलंबून राहू नये. ज्यांना कडक उन्हामुळे ऍलर्जीचा त्रास होतो त्यांनी ओस्क्रीन किंवा हायड्रॉलीफ या गोळय़ा त्वचाविकारतज्ञांच्या सल्ल्यानुसार घ्याव्यात.

आपली प्रतिक्रिया द्या