‘चहा कसा घ्याल?’ सांगत आहेत आहारतज्ज्ञ

2105

अनुजा पटेल, आहारतज्ज्ञ

सकाळचा चहा ही प्रत्येकाची आवड. घरातील ज्येष्ठ मंडळींनी काही गोष्टी पाळल्या तर चहा खरोखरच अमृतासमान होईल.
सकाळचा चहा… प्रत्येकाची सवय, गरज, दिवसभराची निवांत सुरुवात. घरातील मोठ्या मंडळींचा दिवस तर चहाशिवाय सुरुच होत नाही. शिवाय दिवसभरात अधूनमधून चहाचा आनंद घेणारे आजीआजोबा असतात, पण बऱ्याचदा या चहाचे तब्येतीवर दुष्पपरिणाम होतात. ऑसिडीटीचा त्रास सुरू होतो आणि मग चहा पुरताच बंद करायची वेळ येते. हे असं होण्यापेक्षा जर थोडी काळजी घेतली आणि काही बंधने पाळली तर चहाचा आनंद अगदी निर्भेळ घेता येईल.

मुख्यत्वेकरून चहा हा सकाळीच प्यायला जातो. आपली सवय म्हणून नाही तर शास्त्रीयदृष्ट्या चहामध्ये असणारे काही घटक जसे एल-थनाईन, थिओफिलिन आणि कॅफिन ही कॉफिच्या बियांमध्ये असणारी अल्कलॉईड द्रव्ये उत्तेजना देण्यास आणि हुशारी वाढवण्यास मदत करतात. परंतु हे घटक फक्त नैसर्गिक चहामध्येच असतात. बाजारात मिळणाऱ्या बऱ्याचशा आयुर्वेदिक किंवा ग्रीन टीमध्ये हे गुणकारी घटक आढळत नाहीत.

चहाविषयी बरेच गैरसमज ऐकू येतात. चहा कुठला प्यावा? कधी प्यावा? किती प्यावा? की पिऊच नये? वगैरे वगैरे…
खरं तर नैसर्गिक चहामध्ये असलेले फ्लॅवोनॉईडस् हे एक प्रकारचे परिणामकारक ऑण्टिऑक्सिडंट आहे. शास्त्रज्ञांनी संशोधनामध्ये असं म्हटलं आहे की, योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य प्रकारे चहाचे सेवन केल्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला आळा बसतो. शिवाय रक्तातील कॉलेस्ट्रॉल कमी होण्यासाठीसुद्धा मदत होते.

काही आश्चर्यकारक फायदे म्हणजे चहामध्ये वय लपवण्याचेही गुणधर्म आहेत. चहा हे मनाला उभारी देणारे नैसर्गिक पेय आहे. चहा आरोग्याला हानीकारक असतो असं म्हणण्यामागचं मुख्य कारण म्हणजे चहामध्ये आढळणारे टॅनिन, निकोटिन, कॅफिन व स्ट्रिक्टीन. या विषारी घटकांमुळे मानवी पेशींवर वाईट परिणाम होतो. विशेष म्हणजे चहाचा उपयोग शरीरातील हानीकारक जीवजंतूंचा नायनाट करण्यासाठीही होतो. चहामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते.

बऱ्याचदा असे दिसून आले की, चहाचे दुष्परिणाम चहाच्या अतिसेवनामुळे व अयोग्य पद्धतीने बनविलेल्या चहामुळे होतात. चहाचे अतिसेवन केल्यामुळे किंवा अति उकळवलेला चहा प्यायल्यामुळे पित्त बळावते. तसेच एका संशोधनानुसार असंसुद्धा सिद्ध झालंय की, खूप चहा प्यायल्याने शरीरातील कॅल्शियम शोषून घेतले जाते. म्हणून जर तुम्ही कॅल्शियम वाढीची औषधे घेत असाल तर चहा आणि कॅल्शियमची गोळी एकत्र घेऊ नये.

चहा असा बनवा

प्रथम दूध, पाणी व थोडी साखर इ. मिक्स करून उकळी आणा. व्यवस्थितरीत्या उकळून झाल्यावर मग त्यात चहा पावडर टाका व फक्त २-३ उकळ्यात गॅस बंद करा.

चहा घेताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

  • चहा खूप जास्त उकळू नये.
  • चहामध्ये अति प्रमाणात साखर घालू नये,
  • दुधाचे प्रमाण जास्त असावे, चहाबरोबर बिस्किटे खाणे टाळावे.
  • संध्याकाळी उशिरा चहा पिणे टाळा, त्यामुळे झोपेवर परिणाम होतो.
  • चहा तुळशीची पाने, आले टाकून केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • लहान मुलांमध्ये मात्र चहा पिण्याने होणारे तोटेच अधिक आहेत.
  • ग्रीन टीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटविण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
  • ग्रीन टीमुळे अन्न पचनास मदत होते हे सिद्ध झाले आहे. म्हणून शक्यतो दुपारचे जेवण झाल्यावर दीड ते दोन तासांनंतर ग्रीन टी घ्यावा.
  • चहाबरोबर काहीतरी पौष्टिक खायला विसरू नका. उदा. खाकरा, गुळाची चिक्की, अगदी घरातली पोळीसुद्धा चालेल.
आपली प्रतिक्रिया द्या