अटक मल्ल्याच्या पथ्यावर; हिंदुस्थानात आणण्यावर प्रश्नचिन्ह

मल्ल्याची जगभरात असलेली संपत्ती आणि खाती जप्त करण्यात किंवा गोठवण्यात आली आहेत

सामना ऑनलाईन, बंगळुरू

मद्यसम्राट विजय मल्ल्या याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी मंगळवारी केलेली अटक त्याच्या पथ्यावरच पडली आहे. मल्ल्या याला यापुढे हिंदुस्थानी चौकशी यंत्रणांचा ससेमिरा चुकवतानाच आपले प्रत्यार्पण रोखण्यासाठी ती अटक उपयोगी ठरेल, असे कायदेतज्ञांचे मत आहे. त्यामुळे मल्ल्या याला हिंदुस्थानात आणण्याबाबत साशंकताच व्यक्त केली जात आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी ‘एक्सट्रक्शन वॉरंट’च्या आधारे केलेल्या अटकेमुळे मल्ल्या यांचे प्रकरण ब्रिटनच्या न्याययंत्रणेच्या कक्षेत गेले आहे. आता त्याचे हिंदुस्थानला प्रत्यार्पण करण्याचा अंतिम निर्णय होण्याआधी सारे कायदेशीर पर्याय आजमावण्यास मल्ल्या पात्र ठरला आहे. विजय मल्ल्या याला हिंदुस्थानात परत आणणे आता सोपे राहिलेले नाही. त्यासाठीची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे, असे प्रत्यार्पण कायद्याचे तज्ञ असलेले कर्नाटक उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील श्याम सुंदर यांनी सांगितले.

२२ सप्टेंबर १९९५ रोजी हिंदुस्थानने ब्रिटन, नॉर्दन आयर्लंड यांच्याशी प्रत्यार्पण करार केला आहे. पण प्रत्यार्पणाची विनंती नाकारली जाण्यासाठी असंख्य कारणे त्या करारातच नमूद करण्यात आलेली आहेत. मुळात ब्रिटिश कायद्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यार्पणासाठी विनंती करणाऱ्या देशाने त्या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करण्यालाही गंभीर गुन्हा मानले जाते. त्यामुळे अशा प्रकरणात वेस्टमिन्स्टर येथील प्राथमिक न्यायालयात किमान १० सुनावण्यांनंतर निष्कर्ष काढला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीला इंग्लीश न्यायालयात आव्हान-प्रतिआव्हान देण्याचा मार्ग उपलब्ध असतोच.

साडेसहा कोटींचा जामीन बाँड
विजय मल्ल्याची अवघ्या तीन तासांत जामिनावर सुटका झाली. त्याला सशर्त जामीन मिळाला. पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले. ६५०००० पौंडच्या (सुमारे साडेसहा कोटी) जामीन बाँडवर मल्ल्याची सुटका झाली.

मल्ल्या कसा लढणार?
विजय मल्ल्या हा नोंदणीकृत व्यवसायाचा संचालक आहे. तिथे संचालक मंडळ असते. व्यवसायाचा भाग म्हणून त्याने कर्ज घेतले आहे. त्यामुळे थकीत कर्जाबद्दल त्याला एकटय़ालाच दोषी धरता येणार नाही. तसेच त्या कर्जाच्या वसुलीसाठी मालमत्तेच्या लिलावासारखे मार्ग उपलब्ध आहेत. असे असताना मल्ल्या याला एकटय़ालाच टार्गेट करणे पूर्वग्रहदूषित आणि हेतुपुरस्पर ठरेल, असा मुद्दा मल्ल्या याची वकिलांची टीम मांडणार आहे.
प्रत्यार्पण कराराच्या कलम ९वरही मल्ल्याच्या वकिलांची विशेष भिस्त आहे. कुठल्याही देशाने एखाद्या व्यक्तीच्या राजकीय लागेबांध्यामुळे प्रत्यार्पण मागितले तर ही विनंती मान्य केली जाणार नाही, असे त्या कलमातच नमूद केले.