एचपीसीएलच्या गॅस पाइपलाइनने खारपाडावासी होणार उद्ध्वस्त!

सामना प्रतिनिधी । अलिबाग

लोकवस्ती वगळून अन्य मार्गाने गॅस पाइपलाइन नेण्याचे आश्वासन देणाऱ्या एचपीसीएल कंपनीने खारपाडा परिसरातील ग्रामस्थांचा सपशेल विश्वासघात केला आहे. या कंपनीने भरवस्तीतून गॅस पाइपलाइन नेण्याचे काम सुरू केले असल्यामुळे खारपाडावासी उद्ध्वस्त होणार आहेत. गावकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत याबाबत कंपनीने फेरविचार न केल्यास १४ मार्चपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

एचपीसीएलची गॅस पाइपलाइन खारपाडा, दुश्मी, ठाकूरपाडा या परिसरांतून जाणार आहे. १९९१ साली या पाइपलाइनसाठी जमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात लोकवस्ती वगळून वेगळ्या जमिनीतून ही गॅस पाइपलाइन टाकण्याचे आश्वासन एचपीसीएलने दिले होते. मात्र कंपनीने विश्वासघात करत थेट लोकवस्तीतून ही पाइपलाइन बेकायदेशीरपणे टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ हादरून गेले आहेत.

जीवन उद्ध्वस्त करणारा विकास काय कामाचा?
लोकवस्तीतून गॅस पाइपलाइन टाकली जात असल्याने येथील ग्रामस्थांना आता कोणतेही काम करता येणार नाही. एचपीसीएल कंपनी टाकत असलेली गॅस पाइपलाइन ही ज्वलनशील असल्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आमचा विकासासाठी विरोध नाही मात्र विकास होताना आमचे जीवनच उद्ध्वस्त होणार असेल तर या विकासाचा फायदा काय, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.